ताज्या बातम्या राजकीय

टेन्शन नाही, पेन्शन द्या – उद्धव ठाकरे

ठाकरेंचे सत्ताधार्‍यांवर टीकेचे बाण

१२ डिसेंबर नागपूर: राज्यातील सरकार हे केंद्राप्रमाणे केवळ आश्वासनाच्या रेवड्या देणारं सरकार आहे. मी जर मुख्यमंत्री असतो तर सरकारी कर्मचार्‍यांना जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करावं लागलं नसतं.

पाच दिवसांचा आठवडा हा निर्णय मी घेतला. सरकारी कर्मचार्‍यांचं योगदान मला माहिती आहे. या सरकारला त्याचं काही देणंघेणं नाही. त्यामुळे या सरकारला आता पेन्शन नव्हे टेन्शन देण्याची गरज आहे,

असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरातील यशवंत मैदानात सुरु असलेल्या जुन्या पेन्शन आंदोलनाला भेट दिली.

उद्धव ठाकरे यांनी जुन्या पेन्शनसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला भेट देऊन राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी आदित्य ठाकरे भास्कर जाधव यांच्यासह ठाकरे गटाचे आमदारही उपस्थित होते.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आमचं सरकार पेंशन योजनेबद्दल निर्णय घेणार होतं, तेवढ्यात आमचं सरकार पडलं. माझं सरकार पडलं नसतं तर तुम्हाला आज मोर्चा काढावा लागला नसता. आम्ही धोरण बनवतो, तुम्ही अंमलात आणता. हे अवैध सरकार आहे. तुम्ही तुमच्या हक्काचं मागत आहात.

निवडणूक येत आहे, पुन्हा तुम्हाला फसवलं जाईल, जसं २०१४ मध्ये फसवलं होतं, १५ लाख आले का? अच्छे दिन आले का?”तुम्ही शासनात काम करतात. तुम्हाला सर्व सत्य माहीत आहे. आता शिवसेना जेव्हा तुमच्या सोबत आली आहव, शक्ती वाढते आहे. आता आपल्यात राज्यातील नव्हे तर केंद्रात ही सरकार बदलण्याची शक्ती आहे.

काल तुमच्या नेत्यांसोबत चर्चा झाली आहे. माझी शिवसेना आणि माझे शिवसैनिक तुमच्यासोबत आहे. आज स्वागत करू नका, जेव्हा आपलं सरकार येईल आणि जुनी पेंशन लागू होईल, तेव्हा स्वागत करू लढाई थांबवू नका. कोणाच्या फसव्या घोषणेला बळी पडू नका.’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी आंदोलकांनी आदित्य ठाकरे यांनाही बोलण्याची विनंती केली. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, २०२४ साली आमचं सरकार येणार, आम्ही जुनी पेन्शन लागू करणार, एकच मिशन जुनी पेन्शन अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली.