मुंबई

उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील आमदार गणपत गायकवाडांना विधान परिषदेत मतदानापासून रोखले

काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहित घेतला तीव्र आक्षेप

मुंबई – विधान परिषदेच्या ११ जागांवरील निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. १२ उमेदवार रिंगणात असल्यामुळे चुरस वाढली असून एका उमेदवाराचा पराभव अटळ आहे. मतदानासाठी भाजपचे तुरुंगवासी आमदार गणपत गायकवाड हे तळोजा तुरुंगातून रवाना झाले आहेत, मात्र गायकवाडांना मतदान करायला देऊ नये, अशा शब्दात आक्षेप घेणारे पत्र काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिले आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांना पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र आज विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कडक पोलिस बंदोबस्तामध्ये मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले. आमदार गणपत गायकवाड हे विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यामधील तरतुदीनुसार आमदार गणपत गायकवाड विधान परिषद निवडणुकीत मतदान करु शकत नाहीत. त्यामुळे त्यांना मतदान करण्याची परवानगी देऊ नये, अशी काँग्रेसची मागणी आहे.

विधानसभा सदस्य श्री. गणपत गायकवाड हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. The representation of the people Act 1951 सेक्शन 62 (5) नुसार ते मतदानाचा हक्क बजावू शकत नाहीत. विधान सभा सदस्य श्री. गणपत गायकवाड हे मतदान करणार असल्याचे समजते. कृपया त्यांना अवैध मतदान करण्यापासून रोखावे आणि The representation of the people Act.1951 सेक्शन 62 (5) नुसार कोणत्याही दबावात न येता संविधानिक मूल्यांचे रक्षण करावे अन्यथा आपण श्री. गणपत गायकवाड यांना मतदान करु दिल्यास आम्हाला कायदेशीर बाबींचा अवलंब करावा लागेल, असे पत्र काँग्रेसच्या विधानपरिषद उमेदवार प्रज्ञा राजीव सातव यांचे उमेदवार प्रतिनिधी अभिजित गोविंदराव वंजारी यांनी लिहिले आहे.