महाराष्ट्र

वसतिगृहातील विद्यार्थिनींचा संस्थेच्या अध्यक्षांकडून विनयभंग

रत्नागिरी – कोळंबे (ता. संगमेश्वर) येथील कमलजाबाई पांडुरंग मुळ्ये हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या अनधिकृत वसतिगृहात राहणाऱ्या तीन विद्यार्थिनींवर संस्थेच्या अध्यक्षांनीच विनयभंग केल्याची तक्रार दाखल झाली आहे. संस्थेच्या ग्रंथपाल महिलेने दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी संस्था अध्यक्ष नयन मुळ्ये (वय ६७) त्यांचा मुलगा प्रथमेश मुळये (वय ३६), शाळेचे मुख्याध्यापक संजय मुळ्ये यांच्याविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संस्था चालकावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शाळेच्या ग्रंथपाल महिलेने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार कोळंबे येथे कमलजाबाई पांडुरंग मुळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज अंतर्गत मुलांचे वसतिगृह मंजूर आहे, तर संस्थेमार्फत मुलींचे वसतिगृह अनधिकृतपणे चालवले जाते.

गणेशोत्सवादरम्यान शाळेला सुट्टी असल्याने वसतिगृहात राहणाऱ्या एकूण २३ मुलींपैकी २० मुली गणेशोत्सवासाठी आपल्या गावी गेल्या होत्या. तीन मुली सुरुवातीचे काही दिवस तक्रारदाराच्या घरी राहायला आल्या होत्या. मात्र तक्रारदार कामानिमित्त पुणे येथे जाणार असल्याने तिन्ही मुलींनी संस्थाचालक नयन मुळ्ये यांच्याकडे राहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गणेशोत्सव संपेपर्यंत त्या मुली त्यांच्याकडेच राहत होत्या. या कालावधीत नयन मुळ्ये यांच्या राहत्या घरी मुलींचा विनयभंग करण्यात आला. सुट्टी संपल्यानंतर मुलींनी आपल्याला हे सांगितल्याचे ग्रंथपाल महिलेने सांगितले. त्यानुसार आपण तक्रार दाखल करत असल्याचे फिर्यादी महिलेने म्हटले आहे. पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्कोअंतर्गत संस्था अध्यक्ष नयन मुळये (वय ६७) त्यांचा मुलग प्रथमेश मुळये (वय ३६) शाळेचे मुख्याध्यापक संजय मुळ्ये यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटना गणेशोत्सवाच्या काळात घडली असून तीनपैकी एक मुलगी महाविद्यालयात व अन्य दोन मुली शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. पोलिसांनी तिन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. घटनेची सत्यता पडताळणी करून उचित कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.