अकोला

अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह!, ‘अच्छे दिन’ येणार का?

अकोला – अकोला जिल्ह्यात मनसेची ताकद बऱ्यापैकी आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेला ‘अच्छे दिन’ येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ठिकठिकाणी मनसैनिकांकडून राज ठाकरे यांचं जल्लोषात स्वागत केले जात आहे. विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले राज ठाकरे उद्या (ता. 25) रोजी अकोला दौऱ्यावर आहेत. गेल्या अनेक वर्षांनंतर राज ठाकरे हे येणार असल्याने मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या कडून मनसेच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषित केले जाण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्ष देखील मैदानात उतरला आहे. मनसे राज्यभरात जोरदार तयारी करत आहे. मनसे आगामी विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढवणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दौरा करत आहेत. नुकताच मराठवाडा दौरा राज ठाकरे यांनी केला. दरम्यान आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे प्रत्यक्ष मैदानात उतरून पदाधिकारी आणि निरीक्षकांच्या बैठका घेऊन विधानसभेसाठी चाचपणी करतांना दिसत आहेत. त्यामुळे विधानसभेसाठी विदर्भात मनसे शड्डू ठोकणार का?

दुसरीकडे राज ठाकरे या दौऱ्या दरम्यान उमेदवारांची घोषणा देखील करतांना दिसत आहेत. मनसेच्या स्थापनेपासून जिल्ह्यात मनसे कार्यरत आहे. सुरुवातीला महापालिकेतही मनसेचा सभापती, नगरसेवक निवडून आले. आतापर्यंत एकही आमदार निवडून आले नसले तरी मनसेचा आणि राज ठाकरेंचा चाहतावर्ग गावागावात आहे. शहरातही मनसे सक्रिय आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवर आंदोलन केली जातात. सध्या सत्तेच्या रुळावर मनसेचे इंजिन धावत नसले तरी येणाऱ्या दिवसांत मनसेला नवसंजीवनी येईल का? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.