रत्नागिरी – येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या २५ फूट उंच पुतळ्याच्या संरक्षणासाठी पोलीस, सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्हीचे नियोजन करावे, अशी मागणी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर आणि शहर अध्यक्ष नीलेश भोसले यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांना दिले आहे. रत्नदुर्ग किल्ल्याजवळ शिवसृष्टी प्रकल्प पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आला आहे. या शिवसृष्टीचे ४ ऑक्टोबर रोजी लोकार्पण होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प साकारला जात आहे. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा २५ फूट उंच पूर्णाकृती पुतळा आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी या शिवसृष्टीच्या उभारणीसाठी १७ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. आता या पुतळ्याच्या संरक्षणासाठी तरतूद करावी, असे निवेदनात म्हटले आहे.