ताज्या बातम्या

नीट परीक्षेचा निकाल शनिवार दुपारपर्यंत ऑनलाईन जाहीर करा – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली- NEET-UG 2024 साठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेले शहर आणि केंद्रनिहाय निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) शनिवार दुपारी १२ वाजेपर्यंत वेबसाइटवर अपलोड करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात ४० हून अधिक याचिकांवर सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्या. जेबी पारदीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. जर कुणी पेपर लीक केला असेल तर त्याचा हेतू केवळ नीट परीक्षेला बदनाम करण्याचा नाही, तर पैसे कमावणे हा हेतू होता, हे स्पष्ट आहे. संपूर्ण देश नीटच्या परीक्षेबाबतच्या निर्णयाची वाट पाहत आहे. त्यामुळे शनिवार दुपारी १२ वाजेपर्यंत ऑनलाईन निकाल जाहीर करा, असे थेट आदेश सरन्यायाधीशांनी दिले आहेत. याबाबतची पुढील सुनावणी सोमवारी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. तसेच समुपदेशनाला सोमवारपर्यंत स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. समुपदेशन प्रक्रियेला विलंब होणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, समुपदेशन प्रक्रियेस थोडा वेळ लागेल आणि २४ जुलैच्या आसपास सुरू होईल. यावर भारताचे सरन्यायाधीश म्हणाले की, आम्ही या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारीच करू. याचिकाकर्त्यांनी म्हटलं की, NEET-UG परीक्षेचा निकाल वेबसाइटवर प्रकाशित करणे योग्य होईल. ज्यामुळे उमेदवारांना मिळलेल्या केंद्रनिहाय गुणांवर काही पारदर्शकता येईल. NEET-UG परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण प्रकाशित करा आणि प्रत्येक केंद्र आणि शहराच्या संदर्भात विद्यार्थ्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल याची देखील खबरदारी घ्यावी.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याच्या निर्देशाला कडाडून विरोध केला. मात्र, पटना आणि हजारीबागच्या केंद्रांमध्ये पेपर फुटी झाल्याचे सरन्यायाधीशांनी तोंडी मान्य केले. पेपर फुटी त्या केंद्रांपुरतीच मर्यादित आहे की इतर शहरे आणि केंद्रांमध्ये पसरली आहे, हे तपासण्यासाठी निकालांच्या संपूर्ण डेटाचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे.

खंडपीठाने सुरुवातीला एनटीएला शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत निकाल प्रकाशित करण्याचे निर्देश दिले असले तरी प्राधिकरणाचे वरिष्ठ वकील नरेश कौशिक यांनी २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल असल्याने अधिक वेळ देण्याची विनंती केली. त्यानुसार खंडपीठाने शनिवारपर्यंत मुदत वाढवली.