मुंबई

काँग्रेसच्या ८ आमदारांकडून क्रॉस व्होटिंग? वडेट्टीवार बोलले जावईशोध कोणी लावला

मुंबई – राज्यात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्यानं आज मतदान होत आहे. महायुतीचे ९, तर महाविकास आघाडीचे ३ जण आखाड्यात आहेत. परिषदेच्या ११ जागांवर कोण निवडून येणार आणि कोणाचे १२ वाजणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत काँग्रेसची मतं निर्णायक ठरणार आहेत. काँग्रेसची अतिरिक्त मतं कोणाकडे वळतात यावर निवडणुकीचा निकाल ठरेल. विधान परिषदेची निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची २३ मतं गरजेची आहेत. काँग्रेसकडे ३७ मतं आहेत. त्यामुळे काँग्रेसची अतिरिक्त १४ मतं कोणाकडे जाणार याकडे लक्ष लागलं आहे. काँग्रेसच्या एकूण ८ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या ४ आमदारांनी अजित पवार गटाच्या, तर अन्य ४ आमदारांनी भाजपच्या उमेगवाराला मतदान केल्याचं बोललं जात आहे.

भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार पहिल्याच फेरीत जिंकू शकतात. एका खाजगी वाहिनीच्या सुत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. महायुतीमध्ये सर्वाधिक मतांची बेगमी करण्याचं आव्हान अजित पवारांसमोर आहे. त्यांना अधिकची ७ मतं गरजेची आहेत. काँग्रेसच्या ४ आमदारांनी अजित पवारांच्या उमेदवाराला मतदान केल्याची चर्चा आहे. काही अपक्ष, छोट्या पक्षांनीदेखील राष्ट्रवादीला साथ दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे क्रॉस व्होटिंगमुळे राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार निवडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या ४ आमदारांनी भाजप उमेदवारांना मदत केल्याचीही चर्चा आहे. आपले ५ उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला पहिल्या पसंतीची ३ मतं कमी पडत आहेत. त्याची सोय काँग्रेसच्या ४ आमदारांनी केल्याची चर्चा आहे.

भाजप आणि अजित पवार गटाला काँग्रेसच्या ८ आमदारांनी मतांची रसद पुरवल्याची चर्चा असताना भाजप आमदार संजय कुटे यांनी सूचक विधान केलं आहे. काँग्रेसचे आमदार १०० टक्के फुटणार याची कल्पना होती. त्यांच्या पक्षालादेखील याबद्दल माहिती होती. आता मतदानानंतर त्यांचे किती आमदार फुटले ते कळेल. कुठे जायचं, कोणाला मत द्यायचं याची काळजी काँग्रेस आमदारांनी घेतली असल्याचं कुटे म्हणाले. काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा जावईशोध कोणी लावला, असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला. आम्ही काल बोलावलेल्या बैठकीला ३७ पैकी ३५ आमदार हजर होते. ज्यांना भीती होती ते हॉटेलमध्ये पळाले, असा टोला त्यांनी भाजपला लावला. आमदारांवर विश्वास नसल्यानं त्यांनी सगळ्यांना हॉटेलात एकत्र ठेवलं. आम्हाला त्याची गरज नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.