अमरावती – शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्यावर मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास शिंदे गटाचे बडनेरा-तिवसा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख अरुण पडोळे व त्यांच्यासह वीस ते पंचवीस – अज्ञात व्यक्तींनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी दर्यापूर पोलीस स्टेशन येथे मध्यरात्री तक्रार दाखल केली आहे.
अमरावती जिल्ह्यामध्ये शिंदे गटाच्या दोन जिल्हा प्रमुखामध्ये राजकीय मतभेद गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू आहेत. जिल्हाप्रमुख गोपाल अरबट व दुसरे जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांच्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून फोनवरून शाब्दिक बचाबाची सुरू होती. काल शनिवारी रोजी शिवसेनेचे नेते माजी आमदार अभिजीत अडसूळ हे दर्यापूर-अंजनगाव विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते.
रात्री १० वाजता त्यांचा दौरा संपून ते अमरावतीच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांनी आपल्यामध्ये जे राजकीय वाद आहेत त्यासाठी मी माफी मागतो, असे गोपाल अरबट यांना फोनवर बोलत त्यांना प्रसाद मंगल कार्यालय दर्यापूर जवळ बोलावले. गोपाल अरबट हे पत्नी व आपल्या दोन कार्यकर्त्यांसह प्रसाद मंगल कार्यालयाजवळ पोहोचले. त्याठिकाणी अरुण पडोळे व त्यांचा मुलगा यासह वीस ते पंचवीस अज्ञान व्यक्तींनी गोपाल अरबट व पत्नीला व कार्यकर्त्यांना मारहाण केली, असे गोपाल अरबट यांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे.
या दरम्यान दर्यापूर पोलिसांना संपर्क साधला असता दर्यापूर पोलीस उशिरा दाखल झाल्याने या घटनेतील हल्लेखोर हे घटनास्थळावरून पसार झाले असा आरोप गोपाल अरबट यांनी केला आहे. या घटनेसंदर्भात गोपाल अरबट व त्यांच्या पर्नीने दर्यापूर पोलीस स्टेशन येथे मध्यरात्री ३ वाजता सुमारास अरुण पडोळे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सदर घटनेत विविध कलमानुसार अरुण पडोळेसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत.