देश

कुपवाड्यात चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

कुपवाडा – जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे गुरुवारी (१८ जुलै) रोजी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. या चकमकीत लष्कर-ए-तोयबा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दलाने या ऑपरेशन करून अतिरेक्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. नियंत्रण रेषेवर (एलओसी) गेल्या आठवड्यातील दहशतवाद्यांचा असा दुसरा अयशस्वी प्रयत्न आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गुप्तचर यंत्रणेकडून या भागात दहशतवादी शिरल्याची माहिती मिळाली होती. या कारवाईत ६ राष्ट्रीय रायफल्स आणि ६ सी राष्ट्रीय रायफल्सचा समावेश होता. गडद ढग आणि धुक्यामुळे सैनिकांना अतिरेक्यांविरोधात कारवाई करण्यात अडचणी आल्या. अशा प्रतिकुल परिस्थितीतही संकटांना न जुमानता, सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा खात्मा केला.

दुसरीकडे, डोडामध्येही चकमक सुरू आहे. प्रतिकूल हवामानात अधूनमधून गोळीबार होत आहे. डोडामध्ये सोमवारपासून दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू आहे. चार दिवसांत डोडामधील ही तिसरी चकमक असली तरी सुरक्षा दलांना अद्याप यश आलेले नाही. घनदाट जंगले, उंच पर्वत आणि खराब हवामान हे सुरक्षा दलांसमोर आव्हान असले तरी सैनिक खंबीरपणे उभे आहेत. दहशतवाद्यांचा लवकरच खात्मा केला जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

याआधी गेल्या रविवारी (१४जुलै) कुपवाडा जिल्ह्यात तीन सशस्त्र दहशतवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात आले होते. डोडा येथे त्यानंतरच्या शोध मोहिमेदरम्यान, दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. गुरुवारी पहाटे २ च्या सुमारास कास्तीगढ भागातील जद्दन बट्टा गावात लष्कराचे अतिरेकी आणि पोलिस कर्मचारी यांच्यात गोळीबार झाला. चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर येथे उपचार सुरू आहेत. दोडा-किश्तवाड-रामबन रेंजचे डीआयजी श्रीधर पाटील यांनी विश्वास व्यक्त केला की, जंगलाच्या परिसरात सर्व सुरक्षा दलांच्या समन्वयाने सुरू असलेल्या शोध मोहिमेला आणखी यश मिळेल.