विमानतळापासून जल्लोषात निघाली मिरवणूक
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिला आशीर्वाद
नागपूर : राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात डेरेदाखल झालेल्या देवेंद्र फडणवीस यांचे आज, रविवारी भव्य स्वागत करण्यात आले. भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या सोबतच सर्वसामान्य नागरिकांनी पुष्पवृष्टीकरत फडणवीस यांचे जल्लोषात स्वागत केले. नागपूर विमानतळ ते फडणवीसांच्य निवासस्थानादरम्यान निघालेल्या या मिरवणुकीत हजारो जण सहभागी झाले होते.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांचे 12 ताऱखेला नागपुरात आगमन होणार होते. परंतु, काही कारणास्तव तो मुहूर्त टळला आणि 15 तारीख निश्चित करण्यात आली. फडणवीसांच्या स्वागतासाठी विमानतळ ते त्यांचे धरमपेठमधील निवासस्थान असा मिरवणुकीचा मार्ग ठरला. नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर मुख्यमंत्र्यंचे आगमन होताच ढोल, ताशे, नगारे, डीजे अशा नानाविध वाद्यांच्या गजरात सजवलेल्या ट्रकवरून फडणवीसांची मिरवणूक सुरू झाली. यावेळी ट्रकवर मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, भाजपचे
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारत ही मिरवणूक हजारो कार्यकर्त्यांसह पुढे सरकली. मुख्यमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच विमानतळ चौकातील हेडगेवार स्मारकाला नमन केले. पुढे कार्यकर्त्यांची गर्दी, विविध लोकनृत्य सादर करणारे पथक असे दृष्य नागपूरकरांनी अनुभवले. याप्रसंगी मिरवणुकीत ‘विजेता तू.. देवाभाऊ चल पुढे’..‘तुमची आमची सर्वांची भाजप’ व यासह वाजवली जाणारी गीते अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. मिरवणुकीच्या मार्गात स्वागतासाठी चौका-चौकात 60 ते 62 मंच उभारण्यात आले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली होती. इमारतींवर उभे राहून नागपूरकर नागरिक त्यांचे हात दाखवून स्वागत करीत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरमध्ये आगमन झाल्यावर त्यांच्या स्वागतासाठी खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रस्त्यात उभे होते. नागपुरातील खामला परिसरात स्वतः गडकरींनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत, अभिनंदन करून त्यांना आशीर्वाद दिला. तब्बल 4 तास चाललेली ही मिरवणूक पाहुन “आला रे… पुन्हा आला…!” अशा शब्दात सर्वसामान्य नागपूरकर आपली भावना व्यक्त करत होते.