ताज्या बातम्या

बलात्काऱ्याच्या बेकरीवर चालला बुलडोझर

अयोध्या – अयोध्येच्या भदरसा गावात अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी मोईद खान याची बेकरी आज, शनिवारी बुलडोझरने ध्वस्त करण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त गौरव दयाल, आयजी प्रवीण कुमार, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी प्रशासन, उपजिल्हा दंडाधिकारी सोहवाल अशोककुमार सैनी आणि निमलष्करी दलाचे अधिकारी उपस्थित होते.

उपजिल्हाधिकारी अशोक कुमार यांनी सांगितले की, बलात्काऱ्याची बेकरी पाडण्याची कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी महसूल विभागाच्या पथकाने आरोपींच्या मालमत्तेचे मोजमाप केले होते. अन्न सुरक्षा उपायुक्तांनी बेकरीवर छापा टाकून ती सील केली होती. परवानाही रद्द करण्यात आला आहे. जिल्हा महिला रुग्णालयात पीडितेच्या कुटुंबीयांना धमकावल्याचा आणखी एक गुन्हा कोतवाली नगरमध्ये दाखल झाला आहे. उत्तरप्रदेश सरकारचे मंत्री डॉ.संजय निषाद यांनी जिल्हा महिला रुग्णालयात पोहोचून पीडित मुलीची प्रकृती जाणून घेतली. मुलीला न्याय न मिळाल्यास एसपी कार्यालयासमोर आंदोलन करू, असे सांगितले. यावेळी पिडीत बालिकेची अवस्था पाहून मंत्री निषाद यांचे डोळे भरून आले.

यापूर्वी पीडितेच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी लखनऊमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला सर्व प्रकारच्या सुरक्षेचे आश्वासन दिले होते. यानंतर पोलिसांनी कारवाई आणखी तीव्र केली आहे. समाजवादी पार्टीच्या भदरसा नगर युनिटचे अध्यक्ष नेते मोईद खान यांनी एका 12 वर्षांच्या मुलीला बेकरीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. नंतर नोकरासोबत मिळून या बालिकेवर बलात्कार केला. तसेच मुलीवर केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओही बनवला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेशी वारंवार गैरवर्तन केले. पिडीत बालिका गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार पुढे आला. याप्रकरणी पोलिसांनी मोईद खान आणि नोकर राजू खान यांना अटक केली आहे.