ताज्या बातम्या देश

बांगलादेशात सैन्याच्या ताब्यात सत्तेची सूत्रे

अखेर शेख हसीनांचा पायउतार…!

बांगलादेश – बांगलादेशमध्ये आरक्षणासाठी उफाळलेला हिंसाचार शमविण्यासाठी केलेल्या गोळीबारात 100 हून अधिक लोक ठार झाल्यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी राजीनामा देत देश सोडला असून त्या भारताच्या आश्रयाला येण्याची शक्यता आहे. दरम्यान तिथे सैन्याने सत्तेची सूत्रे हाती घेतली असून शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हिंसाचार थोपवण्यासाठी झालेल्या प्रयत्नांमुळे संतप्त झालेल्या जमावाने बांगलादेशमधील पंतप्रधानाच्या निवासस्थानावर हल्ला केला. त्यानंतर पंतप्रधान शेख हसीना पायउतार होऊन लष्करी हेलिकॉप्टरने देश सोडून निघून गेल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

यानंतर लष्कराने सत्ता हातात घेतली असून, देशात पुन्हा शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे सैन्यातर्फे सांगण्यात आले. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला असून, देश चालवण्यासाठी आम्ही अंतरिम सरकार स्थापन करु असे लष्करप्रमुख वाकेर-उझ-जमान यांनी सांगितले. आम्ही देशात पुन्हा शांतता प्रस्थापित करु. आम्ही गेल्या काही आठवड्यांत झालेल्या सर्व हत्यांची चौकशी करू असे आश्वासनही सैन्य प्रमुखांनी दिले. तसेच नागरिकांनी हिंसाचार बंद करण्याचे आवाहन सैन्यातर्फे करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.