मुंबई

मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना

मुंबई – बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना तातडीची मदत उपलब्ध होणे आणि त्यांची भारतात परतण्यासंदर्भातील आवश्यक कार्यवाहीसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. बांग्लादेशातील अशांततेमुळे परदेशी नागरिकांच्या, विशेषतः अशांत भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी तिथे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य दिले आहे. बांग्लादेशातील नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची पाऊले उचलली आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संवाद साधला असून बांग्लादेशातील परिस्थितीचे गांभीर्य पाहता त्वरित कृतीची गरज अधोरेखित केली आहे. प्रभावित विद्यार्थ्यांना सर्व शक्य मदत करण्याची विनंती केली आहे. त्यांची तात्काळ सुरक्षितता सुनिश्चित करणे, आवश्यकता असल्यास बांग्लादेशातील सुरक्षित ठिकाणी त्यांचे स्थलांतर करणे, भारतात त्यांच्या सुरक्षित परतीची प्रक्रिया जलद करणे याअनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांनी चर्चा केली आहे.

बांग्लादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळविणे आणि त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सध्या तिथे असलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची यादी संकलित करून परराष्ट्र मंत्रालयाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्वरित संपर्क साधणे आणि मदत उपलब्ध करणे शक्य होणार आहे. तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवणे आणि केंद्रीय अधिकारी आणि प्रभावित कुटुंबांशी संपर्क ठेवण्यासाठी राज्य शासनामार्फत एक पथकही स्थापन करण्यात आले आहे.

बांग्लादेशातील भारतीय दूतावासाशी समन्वयाने काम करण्यात येत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करता येतील. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांचे मायदेशात परतण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. या आव्हानात्मक काळात राज्य सरकार बाधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसमवेत सक्षमपणे उभे आहे.