महाराष्ट्र मुंबई

अटलजी, अडवानींचा भाजप आता राहिलेला नाही, भाजपला खोडकिडा लागला – उद्धव ठाकरे

मुंबई – अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळातील भाजप आता शिल्लक राहिलेले नाही. धान्याला जसा खोडकिडा लागतो तसा वर्तमानातील भाजपला खोडकिडा लागल्याची विखारी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. रत्नागिरी येथे मंगळवारी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी उद्धव म्हणाले की, अटलजी, अडवानींचा भाजप आता राहिलेला नाही. तो गेला कुठे, हा प्रश्न आहे. भाजपला खोडकिडा लागला आहे. वर्तमानातील पक्षाचे स्वरूप पाहता असा पक्ष संघ स्वयंसेवक आणि भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना तरी मान्य आहे का, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला., तिकडे पक्षाध्यक्ष नड्डा म्हणतात की आम्हाला आम्हाला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नको. म्हणजे ज्यांनी जिवाचे रान करून पक्ष उभारला, तेच आता नव्या भाजपला नको आहेत.

रत्नागिरीचे उमेदवार बाळ माने यांचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले, माने यांनी पक्षासाठी सर्वस्व दिले. पक्ष मोठा केला. पण असा माणूस त्यांना नको. त्यांच्यासारखा नेता आता आम्हाला मिळाला आहे. त्यांना विधानसभेत पाठवण्याची जबाबदारी मतदारांची आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आले, तर रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील लोकांना नको असलेला रिफायनरी प्रकल्प हद्दपार केली जाईल, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली. ठाकरे पुढे म्हणाले, राज्यात तरी काय चालले आहे? महिलांची अब्रू लुटली जात आहे. महागाई वाढत आहे. अदानीचा प्रकल्प मुंबईतच आहे, असे मला वाटले होते.

कोल्हापूर गेलो, तर तिथे पाणी अदानीला विकल्याचे मला समजले. मुंबई विकली, पाणी विकले. टाटा एअरबससारखे चांगले प्रकल्प गुजरातला नेले. कोकणाला काय दिले, तर प्रदूषणकारी प्रकल्प. म्हणूनच आम्ही सत्तेवर आलो, तर बारसू रिफायनरी हद्दपार केली जाईल. मोठे प्रकल्प उभारले जातील आणि रोजगारासाठी जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र मुंबईत उभारले जाईल. राज्यात स्वतंत्र महिला पोलीस ठाणी सुरू केली जातील. कोणाही महिलेला तेथे न्याय मिळेल. जनतेला जे आवश्यक आहे, ते दिले जाईल. पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर राखले जातील. मुलींना शिक्षण मोफत आहे. त्याचप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण दिले जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर प्रत्येक जिल्ह्यात उभारले जाईल, अशी घोषणाही श्री. ठाकरे यांनी केली.देशाला आणि राज्याला दिशा देण्याची वेळ आता आली आहे. मतदारांनी महाविकास आघाडीला निवडून द्यावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.