अकोला : अकोला शहरात एका भाजप पदाधिकारी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे. अकोला शहरातील गौरक्षण मार्गावरील माधवनगर भागात राहणारे ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेडचे संचालक , तथा भाजप राज्य कार्यकारणी सदस्य रामप्रकाश मिश्रा यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. रामप्रकाश मिश्रा हे प्रसिद्ध सरकारी कंत्राटदार असल्याचं समजते. त्यांचे भाजपच्या अनेक नेत्यांसोबत घनिष्ट संबंध आहेत. हल्लेखोरांनी मिश्रा यांच्या घराची दोन ते तीन दिवसांपासून केली असल्याची माहिती आहे. ता.31 ऑगस्ट रोजी रात्री साडे दहाच्या दरम्यान मिश्रा आपल्या घरा जवळ असताना चेहऱ्यावर कपडा बांधलेल्या दुचाकी वरील या दोन आरोपींनी त्यांच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात मिश्रा हे गंभीररित्या जखमी झाले, यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे.
मिश्रा यांच्यावरील हल्ला करणाऱ्या आरोपींचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस आता शोध घेत आहेत. मात्र हा हल्ला नेमका का? आणि कुणी केला? हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेमुळे राजकीय वर्तुळासह शहरात खळबळ उडाली आहे. दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी हा चाकू हल्ला केल्याची माहिती आहे. रामप्रकाश मिश्रा असे या हल्ल्यात जखमी झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांचे नाव आहे. मिश्रा हे घरासमोर वाहनातून खाली उतरले असता त्यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक चाकू हल्ला केला आहे. दरम्यान हल्ला करणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.भाजपमध्ये ते उत्तर भारतीय आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. याप्रकरणी खदान पोलीस अधिक तपास करत आहेत. मिश्रा हे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे दावेदार असल्याची माहिती आहे.