नवी दिल्ली – इस्त्रायलने गेल्या महिन्यात लेबनानमधील हिजबुल्लाह संघटनेच्या दहशतवाद्यांना पेजरच्या माध्यमातून स्फोट घडवून ठार केले होते. अशा प्रकारचे स्फोट घडवणे हा इस्त्रायलचा मास्टरस्ट्रोक होता असे मत सैन्य प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी व्यक्त केले. ते चाणक्य सुरक्षा चर्चासत्रामध्ये बोलत होते. नुकतेच लेबनॉनमध्ये पेजर आणि वॉकी-टॉकीजच्या स्फोटांमध्ये हिजबुल्लाहाचे 40 दहशतवादी ठार झाले होते. तर 3 हजारांहून अधिक जखमी झाले होते. याबाबत जनरल द्विवेदी म्हणाले की, तुम्ही लढायला सुरुवात कराल त्या दिवशी युद्ध सुरू होत नाही, तर जेव्हा तुम्ही नियोजन सुरू करता तेव्हा खर्या अर्थाने युद्ध सुरू झालेले असते. इस्रायलने आता आपले लष्करी लक्ष गाझा पट्टीवरून लेबनॉनच्या उत्तरेकडील सीमेवर हलवले आहे. तिथे त्यांनी हिजबुल्लाहला लक्ष्य केले आहे. इस्रायलने काहीतरी वेगळे केले आहे. इस्रायलने ठरवले होते की, हमास हे त्यांचे प्राथमिक लक्ष्य आहे. इस्रायलने प्रथम हमासचा खात्मा केला. यानंतर दुसऱ्या बाजूला हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेवर लक्ष केंद्रित केले. पेजर्ससाठी तयार केलेली शेल कंपनी एक मास्टरस्ट्रोक होता असेही द्विवेदी यांनी सांगितले.
इस्रायली गुप्तचर संस्था मोसादने डिव्हायसेसच्या बॅटरीवर पीईटीएन ही अत्यंत स्फोटक वस्तू ठेवली होती. परिणामी बॅटरीचे तापमान वाढल्याने त्यांचा स्फोट झाला. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पेजरचा मॉडेल क्रमांक एपी-924 असा होता. प्रत्येक पेजरमध्ये बॅटरीजवळ एक ते दोन स्फोटकं जोडली होती. लेबनॉनमध्ये घटनेच्या दिवशी दुपारी 3.30 वाजता या पेजर्सवर एक मेसेज आला. त्यानंतर पेजरमध्ये बसवलेली स्फोटक सक्रिय झाली होती. लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह सदस्यांच्या पेजर आणि वॉकी-टॉकीजच्या अनेक स्फोटांमध्ये सुमारे 40 दहशतवादी ठार झाले होते. तर 3 हजारहून अधिक जखमी झाले होते.s