अकोला – अकोला ते खंडवा रेल्वे मार्ग तसेच अकोला स्टेशनचा उत्तरेकडील दक्षिण मध्य रेल्वेचे कार्यक्षेत्राचा भाग सेंट्रल रेल्वेकडे हस्तांतरित करण्याचा हालचालींना वेग आला आहे. अकोला जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातील उद्योजक, व्यापारी व प्रवाशांसाठी अत्यंत गरजेचा व महत्वाचा असलेला आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या अखत्यारीत असलेला दक्षिण मध्य रेल्वेचा संपूर्ण नांदेड विभाग मध्य रेल्वे कडे हस्तांतरित करण्याची मागणी अनेक वर्षापासून होत असताना, सध्या 203 किलोमीटरचा अकोला खंडवा रेल्वे मार्ग व अकोला स्टेशनमधील दक्षिण मध्य रेल्वेचा उत्तरेकडील भाग मध्य रेल्वे कडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे. दक्षिण मध्य रेल्वे व सेंट्रल रेल्वे महाप्रबंधकांमध्ये या मुद्द्यावर एकमताने सहमती झाली आहे.
दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद येथे असून त्यांचे सर्वांगीण लक्ष आंध्रप्रदेश, तेलंगाना, आणि दक्षिणात्य राज्यांच्या रेल्वे सुविधा, नवीन रेल्वे प्रकल्प, आणि रेल्वेच्या विकासाकडे असल्यामुळे दक्षिण मध्य रेल्वे मधील नांदेड डिव्हिजन अंतर्गत येणाऱ्या मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ क्षेत्रावर सातत्याने अन्याय होत होता. त्यामुळे विविध लोकप्रतिनिधींसह रेल्वे संघर्ष कर्ते यांच्याकडून संपूर्ण नांदेड डिव्हिजन ला मध्य रेल्वे कडे हस्तांतरित करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. सध्या ही मागणी पूर्ण झाली नसली तरी नांदेड डिव्हिजन मधील अत्यंत महत्त्वाचा असणारा तब्बल 203 किलोमीटरचा अकोला खंडवा रेल्वे मार्ग आणि अकोला स्टेशन मधील दक्षिण मध्य रेल्वे चा उत्तरेकडील भाग मध्य रेल्वे कडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्णत्वास आली आहे.
या मार्गाचे विद्यमान डिव्हिजन नांदेड असले तरी झोनचे मुख्यालय सिकंदराबाद येथे आहे. हा मार्ग मध्य रेल्वे कडे हस्तांतरित झाल्यावर मध्य रेल्वेचे मुख्यालय महाराष्ट्रातील मुंबई येथे आहे. तसेच हा मार्ग मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अकोला खंडवा मार्गाच्या गेज परिवर्तनासह विद्युतीकरण, दुहेरीकरणाला गती मिळण्यासह पश्चिम विदर्भातील रेल्वेचे जाळे वाढण्याच्या आशा सुद्धा पल्लवीत झाल्या आहेत.
दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद चे जनरल मॅनेजर अरुण कुमार जैन यांनी रेल्वे बोर्ड,अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, नवी दिल्ली यांना अत्यंत महत्वाचे पत्र लिहून दक्षिण मध्य रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या दोन्ही महाप्रबंधकांमध्ये झालेल्या महत्त्वाच्या पत्र व्यवहारांचा तपशील देऊन दोन्ही झोन मध्ये अकोला खंडवा रेल्वे मार्ग आणि अकोला स्टेशन चा उत्तरेकडील भाग मध्य रेल्वे कडे हस्तांतरित करण्याबाबत आधीच सहमती झालेली असल्याचे कळविले आहे. सोबतच हा मार्ग मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्याचे फायदे सुद्धा वर्तविले आहेत. त्यासाठी मंजुरी करिता यापूर्वीसुद्धा रेल्वे बोर्ड दिल्लीकडे पाठविण्यात आले होते परंतु मंजुरीची प्रतीक्षा होती. आता पुन्हा लवकरात लवकर मंजुरी देण्याची मागणी थेट दक्षिण मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांद्वारेच करण्यात आल्यामुळे लवकरच ही मागणी पूर्ण होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
बजेट पूर्वी हिवरखेड विकास मंच संयोजक धिरज बजाज आणि भाजपा नेते श्याम आकोटकर यांनी रेल कल्याण समिती हिंगोली, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि रेल्वे संघर्ष कर्त्यांच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव यांच्याशी चर्चा करून रेल्वे संबंधित महत्त्वाच्या मागण्या करून त्यांचे महत्त्व पटवून दिले होते. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी तात्काळ दखल घेऊन याबाबत प्रधानमंत्री, वित्त मंत्री, रेल्वे मंत्र्यांसह वरिष्ठ स्तरावर पत्र व्यवहार करून मागण्या रेटून धरल्या होत्या. तसेच खासदार अरविंद सावंत यांनी नुकताच संसदेत नांदेड डिव्हिजन मध्य रेल्वे कडे देण्याचा मुद्दा जोरदारपणे उचलून धरला. या सर्व घडामोडी पाहता एकाच आठवड्यात दोन मोठ्या घडामोडी घडल्या असून केंद्र शासनाने राजपत्र काढून अकोला आणि बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना अकोला खंडवा रेल्वे प्रकल्पासाठी विशेष मध्यस्थ अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ऐतिहासिक अकोला खंडवा रेल्वे मार्ग मध्य रेल्वे कडे देण्याची मागणी पूर्णत्वास येत आहे.