अकोला

आता अकोल्यात पाचही मतदारसंघात ‘आम आदमी पक्ष’ देणार उमेदवार !

अकोला – लोकसभा निवडणुकीनंतर आता खऱ्या अर्थाने वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे ही निवडणूक अवघ्या काहीच महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्यासाठी आता सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. विधानसभा मतदारसंघावर दावे करण्यात येत आहेत. अशातच आता आम आदमी या पक्षांने तयारी सुरू केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी आम आदमी पक्ष उमेदवार देणार आहे. तर अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात आम आदमी पक्ष उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती जिल्हा संयोजक कैलाश प्रांजळे, महानगर अध्यक्ष अलहाज मसूद अहेमद यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून जागावाटपावर प्राथमिक चर्चांना वेग आला आहे. तर देशातील सर्वच पक्षांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये दिल्ली आणि पंजाब मध्ये यशस्वी ठरलेला आम आदमी पक्ष ही सज्ज झाला आहे. राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीकडे आम आदमी पक्षानेही लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने पहिल्यांदाच उडी घेतली होती. जवळपास 50 ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले होते. आता पुन्हा यावर्षीच्या निवडणूकीत आम आदमी जास्त उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यासाठी पक्षाकडून स्थानीक पातळीवर लक्ष केंद्रित केले आहे. अशातच विदर्भातील काही महत्वाच्या जिल्ह्याकडेही आम आदमी पक्षांने फोकस केला आहे. यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ आदी जिल्ह्यात आम आदमी उमेदवार देणार आहे. तर आम आदमी पार्टी अकोला जिल्ह्यात असलेल्या 5 विधानसभेच्या जागांवर आपले सक्षम उमेदवार उभे करणार असल्याची माहिती जिल्हा संयोजक कैलाश प्रांजळे, महानगर अध्यक्ष अलहाज मसूद अहेमद यांनी दिली आहे .

देशात पंजाब व दिल्ली या राज्यात जनतेने आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत दिले. सरकार स्पष्ट बहुमतात असल्याने पंजाब आणि दिल्लीतील जनतेला 200 युनिटपर्यत मोफत विज, शिक्षण मोफत आरोग्याच्या सोयी, सुविधा, सर्व मुलांना मोफत दर्जेदार शिक्षण आदी सुविधा देण्यात आम आदमी पक्ष यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पंजाब आणि दिल्ली प्रमाणेच महाराष्ट्रातील जनतेलाही सुविधा मिळाल्या पाहिजे. त्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातील 288 जागा लढविण्याचा निर्धार आम आदमी पक्ष देणार असल्याचे माहिती देण्यात आली आहे. तर उमेदवारी जाहीर करतांना प्रथम प्राधान्य हे पक्षातील सक्षम उमेदवार यांना दिले जाणार असल्याचे सांगितले. उमेदवारी जाहीर करतांना प्रथम प्राधान्य पक्षातील सक्षम पवाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना दिले जाईल, ज्या ठिकाणी जागा उपलब्ध असल्यास सक्षम उमेदवार निवडीचा विचार पक्षश्रेष्ठी करेल व त्यांची उमेदवारी घोषित करेल.