महाराष्ट्र

लाडकी बहीणीनंतर आता ‘लाडका भाऊ’ योजना’

मुंबई – राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना नुकतीच सुरू करण्यात आली. त्यानंतर आता राज्यातील तरुणांसाठी राज्य सरकारने एक योजना सुरू करण्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष आणि कौशल्य विकास विभागामार्फत ग्रामीण व शहरी रोजगार निर्मिती वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत बारावी उत्तीर्ण, आयटीआय व पदविका उत्तीर्ण, पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण तरुणांना स्टायपेंड म्हणून ८ ते १०,००० रुपये प्रत्येक महिन्याला दिले जाणार आहेत.  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता ५५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) द्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

राज्यातील युवकांना प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होऊन रोजगार मिळण्याच्या संधी निर्माण होणार आहेत. युवकांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते नोकरी- व्यवसायाच्या शोधात असतात. युवकांना व्यवसाय व नोकरी प्राप्त करण्यासाठी त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य प्राप्त व्हावे, यासाठी शासन त्यांच्यासोबत आहे. बारावी उत्तीर्ण, आयटीआय व पदविका उत्तीर्ण, पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण यामधील युवकांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. उद्योजक आणि बेरोजगार युवकांमध्ये संवाद निर्माण करून त्यांना उद्योग-व्यवसायाच्या त्यांच्या क्षेत्रातील संधी उपलब्ध व्हाव्या, यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्यांनी प्राप्त केलेल्या कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्या जाणार आहेत.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची वैशिष्ट्ये
१) बारावी, आयटीआय, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करू शकतील.
२) विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग/ स्टार्टअप्स, विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदवण्यात येईल.
३)  सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) च्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील.
४) या कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) चा कालावधी ६ महिने असेल आणि या कालावधीसाठी उमेदवारांना या शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल.
५)  हे विद्यावेतन लाभार्थी तरुणाच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल.

उमेदवारांची पात्रता -:
१) उमेदवाराचे किमान वय १८ आणि कमाल वय ३५ वर्षे असावे.
२) उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता – बानावी पास/आयटीआय/पदविका/ पदवीधर/पदव्युत्तर असावा.
३) उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
४) उमेदवाराची आधार नोंदणी असावी
५) उमेदवाराचे बँक अकाऊंट आधार संलग्न असावे.
६) उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी केलेली असावी.

शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतनाचे विवरण खालीलप्रमाणे
१) शैक्षणिक अर्हता प्रतिमाह विद्यावेतन रुपये
२) बारावी पास ६,००० रुपये
३) आयटीआय / पदविका ८,००० रुपये
४) पदवीधर / पदव्युत्तर १०,००० रुपये