अमरावती

अमरावतीमध्ये मतदानानंतर प्रशासन अलर्ट मोडवर

अमरावती – लोकसभा निवडणुकीसाठी महिनाभरापासून दिवस-रात्र डोळ्यांत तेल घालून कर्तव्य बजावणाऱ्या जिल्हा निवडणूक प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मतदानानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला. असे असले तरी मतमोजणी होईपर्यंत म्हणजे तब्बल 38 दिवस प्रशासनाला अलर्ट राहावे लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे विहित कालावधीत अहवालही सादर करायचा आहे. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या देखरेखीखाली अहवालांची जुळवाजुळव सुरूच आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांत 1 हजार 983 मतदान केंद्रांमध्ये शुक्रवारी मतदान झाले. मतदान प्रक्रियेसाठी १० हजार ३०० अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामांसाठी वर्ग करण्यात आले होते. शुक्रवारी जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर मोठ मोठया रंग लागल्या होत्या तर काही केंद्रांवर सायंकाळी मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरू होते. दूरच्या अंतरावरील केंद्रांतून मतदान प्रक्रिया पूर्ण करून पथके रात्री उशिरा अमरावती मध्ये दाखल झाले त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत ईव्हीएम जमा करण्याचे काम सुरू होते.शनिवारी सुद्धा काही ईव्हीएम मशीन या ठिकाणी येणे सुरु होत्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात लगबग
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार हे आपल्या टीम सह शुक्रवारी दिवस-रात्र मतदान प्रक्रियेवर नजर ठेवून होते. त्यांच्या निर्देशानुसार, लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा क्षेत्राच्या सर्व मतदान केंद्रांतील माहिती गोळा करण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती.तर शनिवारी जिल्हाधिकारी हे लोकशाही भवन या ठिकाणी तळ ठोकून होते. मतदानाशी संबंधित सर्व अहवाल अपडेट करणे व विविध आकड्यांची जुळवाजुळव, क्रम लावणे यासारख्या कामांत यंत्रणा गुंतली होती. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सुद्धा उशिरा केंद्रांवरून परतलेल्या पथकांकडून साहित्य जमा झाल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारीही सकाळच्या सत्रात लगबग सुरूच होती. लोकशाही इमारती मध्ये स्ट्राँग रूममध्ये सर्व इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पोहोचल्यावरच यंत्रणेने मोकळा श्वास घेतला.