अकोला : जुने शहरातील पुरातन श्री जागेश्वर अंबिका संस्थानाच्या खोदकामात शुक्रवारी (ता. २०) २५ फूट खोल भुयार आढळून आले.
या मंदिराची स्थापना सन १६१९ मध्ये करण्यात आली होती. जुने शहरातील जागृत श्री जागेश्वर अंबिका संस्थानच्या मंदिराचे बांधकाम दगडात झाले आहे.
सन १६१९ मधील या मंदिराच्या बाजूलाच नवीन सभागृहाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी सुमारे २५ फुट भुयार अर्थात पेव (जुन्या काळात ग्रामीण भागात धान्य ठेवण्याची जागा) आढळून आले.
भुयार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. शिवकालीन असलेले हे मंदिर काळ्या दगडांपासून बांधण्यात आले आहे. यासाठी २० डिसेंबर रोजी खोदकाम करण्यात आले.
मुख्य द्वाराजवळ आतमधील भागात खड्डा खोदण्याची काम सुरू होते. याठिकाणी छोटे भुयार आढळून आले. त्यानंतर दुपारी भुयारात दगड टाकून ते बुजवण्याची प्रक्रिया सुरू झाली.
जय हिंद चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरून हे मंदिर आतमध्ये आहे.त्यामुळे या मुख्य रस्त्यावर मंदिराकडे जाणारे प्रवेशद्वार असावे, असा विचार परिसरातील युवकांच्या मनात आला.
याच ठिकाणी एका वाणिज्य संकुलचे बांधकाम कंत्राट मिर्झा शौकत बेग करत आहेत. प्रवेशद्वाराजवळ हे काम सुरू असल्याने द्वार उभारण्यासाठी युवकांनी वेग यांच्याशी चर्चा केली. चर्चेच्या वेळी मीच संपूर्ण बांधकाम करून देतो, असा प्रस्ताव बेग यांनी ठेवला आणि युवकांनीही प्रस्तावाला होकार दिला. त्यानुसार येथे काही दिवसांपूर्वीच प्रवेशद्वार बांधण्यात आले.