ताज्या बातम्या

महाराष्ट्रात एकट्याच्या मर्जीने पक्ष चालणार नाही

कोअर कमिटीला सोबत घ्या, भाजप पक्षश्रेष्ठींच्या सूचना

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठा पराभवाचा सामना करावा लागला. भाजपला अपेक्षित असलेल्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून सर्वात कमी जागा मिळाल्या. त्यामुळे दिल्लीकरांनी पराभवाची कारणमिमांसा सुरू केली आहे. त्यातच देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील भाजप कोअर कमिटीची मंगळवारी दिल्लीत बैठक घेण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातील पराभवावर भाष्य करीत राज्यातील भाजप नेत्यांची शाळा वरिष्ठांनी घेतली. तसेच महाराष्ट्रात कोणा एकट्याच्या मर्जीने पक्ष चालणार नाही, कोअर कमिटीला सोबत घ्या, अशा सूचनाच दिल्लीतील नेत्यांनी केल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची विनंती केली होती. मात्र, भाजपच्या वरिष्ठांनी त्यांना कायम राहण्याच्या सूचना करत काम सुरुच ठेवा, असे सांगितले होते. त्यानंतर मंगळवारी दिल्लीत झालेल्या बैठकीतून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देवेंद्र फडणवीस आणि कोअर कमिटीला महत्त्वाच्या सूचना केल्या. कोण्या एका व्यक्तीच्या मर्जीने महाराष्ट्रात पक्ष चालू शकत नाही. कोअर कमिटीला सोबत घेऊनच पक्ष चालवावा लागणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला थांबवायचे असेल तर भाजपने एकत्रितपणे काम करायला हवे. महाराष्ट्रातील भाजपच्या सर्वच जुन्या नेत्यांना सक्रीय करायला हवे, अशा शब्दात दिल्लीच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यातील भाजप नेतृत्वाची शाळा घेतली.

विधानसभेच्या तयारीला लागा
विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागा. आतापासूनच उमेदवारांना तयारी सुरू ठेवायला सांगा. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या, त्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा होऊ देऊ नका, महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणायची आहे, अशाही सूचना भाजपच्या वरिष्ठांनी कोअर कमिटीला केल्या आहेत. महाराष्ट्र भाजपच्या सोशल मीडियावर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची माहिती आहे. दिल्लीतील बैठकीत राज्यातल्या सोशल मीडियातील प्रचारासंदर्भातही चर्चा झाली. सोशल मीडियात भाजपविरोधात केलेल्या प्रचाराला उत्तर देण्यात राज्यातील नेते कमी पडल्याचे मत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने व्यक्त केले. तसेच विरोधकांकडून जे मुद्दे सोशल माध्यमांमध्ये मांडले गेले, त्याला उत्तर देण्यात भाजप नेते कमी का पडले, अशी विचारणाही करण्यात आली.