अमरावती : मालमत्ताकर थकीत ठेवणाऱ्या तब्बल ४ हजार ६०० पेक्षा अधिक मालताधारकांना महापालिका प्रशासनाकडून नोटीस पाठविण्यात आल्या आहे. या मालमत्ताधारकांनी मुदतीत कर न भरल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई केल्या जाऊ शकते, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, १ जानेवारीपासून आधीच थकबाकीदार मालमत्ताधारकांना प्रतिमाह दोन टक्के अर्थात वार्षिक २४ टक्के दंड लागू, झाला आहे.
महापालिकेने २०२३-२४ मध्ये नव्याने मालमत्ता सर्वेक्षण व मूल्यांकन करून वाढीव दर लागू केले होते; मात्र त्यामुळे मालमत्ताधारकांमध्ये पसरलेली नाराजी लक्षात घेता सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनीही या वाढीव दराला विरोध केला. त्यानंतर आ. सुलभा खोडके यांच्या पाठपुराव्यानुसार राज्यशासनाने वाढीव दराला तूर्तास स्थगिती दिली. त्यामुळे आता २००५ या वर्षातील जुनेच दर लागू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे २०२३-२४ मध्ये नवीन दरानुसारही कर भरणाऱ्यांमध्ये बहुतांश मालमत्ताधारक मध्यमवर्गीय होते. त्यांच्या कराच्या उर्वरित रकमेचे यावर्षीच्या करात समायोजन करण्यात येत आहे; मात्र साधारणतः उच्च मध्यमवर्गीय व प्रामुख्याने उच्चभ् वर्गातील मालमत्ताधारकांकडूनच कर भरण्यासाठी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता जुन्या दरानुसार का होईना, पण करवसुली करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी सुटीच्या दिवशीही शिबिरे आयोजित केल्या जात असून, कराचा भरणा करण्यासाठी ऑफलाइन व ऑनलाइन असे वेगवेगळे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानंतर आता किमान ५०हजार रुपये व त्यापेक्षा अधिक कर थकीत असणाऱ्या ४ हजार ६०० पेक्षा अधिक मालमत्ताधारकांना इशारावजा नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसला त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर दुसऱ्यांदा जप्तीची नोटीस देण्यात येईल. त्यानंतरही प्रतिसाद दिला नाही, तर मात्र बेट जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कर मूल्यांकन विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, महापालिकेच्या तिजोरीत सध्या ठणठणाट असल्याने साफसफाईसह विविध विकासकामांनाही बेक लागला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठो आवाहन करण्यात येत आहे.