3,102 farmers committed suicide in the district
अकोला

अकोला जिल्ह्यात ३,१०२ शेतकऱ्यांनी संपवले जीव

अकोला : शासन, प्रशासनाकडून शेतक-यांसाठी राबवण्यात येणा-या योजना कुचकामी ठरत असल्याने दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायचे नाव घेईना.

मागील २४ वर्षामध्ये (२००१ पासून आजपर्यंत) तब्बल ३,१०२ शेतक-यांनी नापिकी, कर्जबाजारीपणामुळे आपले जीवन संपवले आहे. ऐकतिसशे आकडा एवढा मोठा आहे की, एका गावाची लोकसंख्या ८०० च्या जवळपास पकडली तर चार गावे आत्महत्यांमुळे उद्धस्त झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

या सर्व आत्महत्या रोखण्यात शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी अपयशी झाल्याचे दिसून येते. दुसरीकडे जिल्हयातील शेतकरी नेतेही केवळ नावापुरतेच भजन करीत असल्याने मुळ प्रश्नांकडे दुर्लक्षच झाले आहे.

बळीराजा हा देशाचा अन्नदाता म्हणून संबोधतो. पण याच बळीराजाचे बळी जिल्हयात जात आहेत. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, १ जानेवारी २००१ ते डिसेंबर २०२४ या २४ वर्षात अकोला जिल्ह्यातील ३,१०२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची सरकारदरबारी नोंद आहे.

अकोला तालुक्यात सर्वाधिक ७०९ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. तसेच बार्शीटाकळी तालुक्यात ४४९, अकोट तालुक्यात ४३९, तेल्हारा तालुक्यात ३५४, बाळापूर तालुक्यात ३३०, पातूर तालुक्यात ३७५ आणि मूर्तिजापूर तालुक्यात ४४१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, अशाप्रकारे एकूण ३१०२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची शासनदरबारी नोंद आहे.

अकोला जिल्हयात साडेतीनशे हेक्टरहून अधिक जमीन ही खारपाणपट्यात येते. जिल्ह्यात कुठेही सिंचनाची प्रभावी साधने नाहीत. अल्प सिंचनाचा लाभ फार कमी शेतकऱ्यांना मिळतो. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतो.

काही वर्षापासून पावसाअभावी किंवा अतिवृष्टीमुळे किंवा वेळेवर पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे शेतीशी निगडीत उद्योगांचीही मोठी कमतरता आहे.

त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. यावर्षीही जून-जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

८० हजार हेक्टर क्षेत्राहून अधिक खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यापैकी अनेक शेतकऱ्यांचे पैसेही मिळाले नाही.

तसेच पीक विमा काढूनही लाभ वेळेत मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे. कृषी, महसूल व लोकप्रतिनिधींमध्ये कुठलाही ताळमेळ नसल्यानेच बळीराजा विविध समस्यांनी ग्रस्त असल्याची वस्तूस्थिती आहे.