नवी दिल्ली : कर्नाटकच्या बंगळुरमध्ये 8 महिन्यांच्या बाळाला एचएमपीव्हीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. शहराच्या उत्तर भागातील बाप्टिस्ट हॉस्पिटलमध्ये हे प्रकरण निदर्शनास आले. मात्र, यानंतर काही तासांमध्ये दुसरा रुग्णसुद्धा बेंगळूरमध्ये आढळून आल्याची माहिती होती. तसेच गुजरातमध्ये देखील एक रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) कर्नाटकात ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसची (एचएमपीव्ही) 2 प्रकरणे शोधून काढली आहेत. देशभरातील श्वसनाच्या आजारांवर नजर ठेवण्यासाठी आयसीएमआरच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, एकाधिक श्वसन विषाणूजन्य रोगजनकांच्या नियमित देखरेखीद्वारे दोन्ही प्रकरणे ओळखली गेली: आहेत. अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केली आहे.
जगाला हादरवून सोडणाऱ्या कोविड-19 महामारीनंतर चीनमध्ये एचएमपीव्ही या विषाणूने दार ठोठावले. आता भारतात त्याचे पहिले प्रकरण समोर आले आहे. एचएमपीव्ही सहसा फक्त लहान मुलांमध्ये आढळतो. सर्व फ्लू नमुन्यांपैकी 0.7 टक्के एचएमपीव्हीचा असतो.
या विषाणूला मानवी मेटाप्युमोव्हायरस किंवा एचएमपीव्ही विषाणू म्हणतात, ज्याची लक्षणे सामान्य सर्दीसारखी असतात. सामान्य प्रकरणांमध्ये यामुळे खोकला किंवा घरघर, नाक वाहणे किंवा घसा खवखवणे होतो. एचएमपीव्ही संसर्ग लहान मुले आणि वृद्धांमध्ये गंभीर असू शकतो. या विषाणूमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या लोकांमध्ये गंभीर आजार होऊ शकतो.