नवी दिल्ली : स्पाईसजेट ही खासगी विमान कंपनी आर्थिक संकटाचा सामना करत असल्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांची कपात करण्याची तयारीत आहे. कंपनीमधील १४०० कर्मचाऱ्यांच्या नोकरी गमवावी लागणार आहे. यामुळे कंपनीचा खर्च कमी होईल असे कंपनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास जपण्यासाठी कंपनीवर खर्च कमी करण्याचा दबाव आहे.
स्पाईसजेटमधील १,४०० कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे १५ टक्के आहे. कंपनीने एक अहवाल जारी करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सध्या कंपनीमध्ये सुमारे ९ हजार कर्मचारी आहेत. कंपनी सध्या सुमारे ३० विमाने चालवते, त्यापैकी ८ भाडेतत्त्वावर घेतलेली आहेत. गुंतवणूकदारांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी कंपनीवर खर्च कमी करण्याचे दडपण आहे. कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांची वेतन रक्कम तब्बल ६० कोटींचे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कंपनी खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. १४०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणे हा देखील खर्च कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे, असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीचे कर्मचारी फार पूर्वीपासून वेतन कपातीचा सामना करत आहेत. अशातच आता गेल्या अनेक दिवसांपासून कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगारही रखडले आहेत. कंपनीतील कर्मचाऱ्यांना अजूनही जानेवारी महिन्याचा पगार दिला नसल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.