Holika-dahan
लेख

स्त्रिला जाळून आनंदोत्सव करणे संस्कृती आहे का?

भारतात अनेक रुढी परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेल्या आहेत. अनेक अनिष्ट रुढी सामाजिक क्रांती च्या माध्यमातून अनेक सामाजिक क्रांतिकारक यांनी हानुन पाडले आहेत. परंतु आजही अनेक रुढी परंपरा कायम आहेत. हजारो वर्षापासून शिक्षणापासून दुर ठेवून अज्ञान आणि अंधश्रद्धा पेरून तर्क व विज्ञानवादाची हत्या केली गेली. परंतु अलिकडे शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश समाजात पडला परंतु हजारो वर्षे माणसिक गुलामगिरी मध्ये असलेला समाज शिक्षीत होऊन ही मानसिक गुलामगिरी व रुढी परंपरा मधून दिल्या गेलेल्या अज्ञान व अंधश्रद्धा आजही पाळताना दिसत आहे.

आजही शिकलेल्या लोकांच्या मनात भिती आहे जुन्या रुढी परंपरा आपण झुगारून दिल्या तर आपले वाईट होईल. अनेक लोक अंधश्रद्धा यासाठी पाळत आहेत कारण त्यांना वाईट होईल याची माणसिक भिती आहे. थोडक्यात काय तर शिक्षणाचा वापर फक्त नोकरी करण्यासाठी आज होताना दिसतोय.

जेव्हा महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांनी शिक्षण सुरू केले तेव्हा त्यांना वाटले होते शिक्षणामुळे समाज जागृत होईल व मेंदूचा वापर करून सत्य असत्या मधला फरक समजून सत्याचा स्विकार ते तर्क, पुरावे, विज्ञान व कसोटीवर तपासून करतील आणि शैक्षणिक क्रांतीमुळे समाजातील अज्ञान आणि अंधश्रद्धा कायमच्या जाऊन समाजात विज्ञान व तर्कशुद्ध आचार विचार तयार होतील.

परंतु सध्य परिस्थिती आहे कि लिहता वाचता येणार्‍या लोकांना काय वाचाव हे कळत आणि काही लोकांनी वाचले तर अर्थ कळत नाही. तर्क आणि विज्ञान तर दुरच. सावित्रीमाई फुले मुळे शिकलेल्या महिलांनी सावित्रीमाईलाच वाचले नाही ही लाजिरवाणी आणि कृतघ्न पणाची गोष्ट आहे.

असो तरही महत्वाचा प्रश्न हा आहे प्रत्येकाने तर्क व विज्ञानावर आधारित वर्तन ठेवले पाहिजे काळ वेळेनुसार बदलले आवश्यक आहे. सर्व च रुढी परंपरा झुगारून द्यायच्या तर मुळीच नाही ज्या परंपरा मानसाचा मेंदु उघडून माणसाला जागृत करतो, माणसाला माणसाशी मानुसकीने वागायला शिकवते, ज्या माणसाला समान समजून मानसाचे कर्म बघुन श्रेष्ठत्व ठरवतात त्या नक्कीच चांगल्या रुढी परंपरा आहेत. परंतु रुढी परंपरा मधून अज्ञान, अंधश्रद्धा आणि द्वेष पसरत असेल तर त्या रुढी परंपरा सोडून देणेच फायद्याचे ठरते.

भारतात विषेशतः महाराष्ट्रात अनेक महापुरुष व संत होऊन गेले. अनेकांनी रुढी परंपरा ह्या चुकीच्या व कुचकामी कशा आहेत यावर प्रबोधन केले. ज्या संतानी आपल्या तर्काच्या व पुराव्यांच्या आधारावर अनिष्ट रुढी परंपरा हानुन पाडल्या त्याच संताच्या भुमित आपण संताचे विचार बाजूला ठेवून तर्क व विज्ञानाचा आधार न घेता संताच्या विचाराच्या विरोधात काम करत आहोत. बर जे करतो त्याला ना तर्क असतो ना पुरावा असतो तरीही आपण ते करतो याचाच अर्थ आपला मेंदु आपल्या डोक्यात असला तर त्यावर ताबा आपला नाही म्हणजेच आपण गुलाम आहोत आणि हिच बाब स्वतः च्या कुटुंबांचे आणि देशाचे वाटोळे करण्यासाठी पुरेशी असती.

आमच्या देशात अनेक महापुरुष व संत होऊन गेले ज्यांनी पर स्त्रिला महिलेला आईचा दर्जा दिला. पर स्त्रिला आई मानण्याची शिकवण संतानी दिली. परस्त्रिचा आदर करणे हे आपली नितीमत्ता, वैचारिकता व संस्कार दाखवत असते. आपण एकीकडे स्त्रियांची देवी म्हणून पुजा करतो आणि दुसरी कडे एका स्त्रिला जाळून आनंदोत्सव साजरा करतो. एकिकडे महिलेंची पुजा करायची आणि दुसरीकडे स्त्रीलाच जाळून आनंदोत्सव साजरा करायचा हे मनाला पटणारे, तर्काला न पटणारे आहे. एखाद्या चा मृत्यू झाला तर सर्व गाव सुतक पाळून दु:ख व्यक्त करण्याची आमचु संस्कृती.

एखादी स्त्री घरी आली तर तीला साडी, चोळी, पक्वान्न करून सन्मान करण्याची आमची संस्कृती असेल तर होळीका स्त्रिला जाळून आनंदोत्सव साजरा करणे ही विकृती नाही का? मुळात चुकिच्या, विकृत, अज्ञान व अंधश्रद्धा यांचा संबंध एखाद्या धर्माशी जोडणे हेच सर्वात मोठे अज्ञान आहे. मग होळीकाला का जाळते जाते याबद्दल दोन गोष्टी आहेत. एक गोष्ट तर बहुतांश लोकांच्या मनाला पटतच नाही. परंतु आपण दुसरी गोष्ट जी जास्त लोकांना पटते ती आपण तर्काच्या आधारावर तपासून बघू. तर्क करताना डोक्यात पूर्वग्रह न ठेवता निष्पक्ष करणे आवश्यक आहे.

सर्वांना माहिती असलेली गोष्ट म्हणजे हिरण्यकश्यप हा स्वतः ला देव समजत होता विष्णु प्रमाणे सर्वांनी त्याची पुजा करावी अशी त्याची इच्छा होती अनेक लोक त्याची पूजा करत होते परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद त्याची पुजा न करता विष्णुची पुजा करत होता. आणि प्रल्हाद ला धडा शिकवण्यासाठी होळीका व हिरण्यकश्यप कट करतात होळीका कडे शिव अर्थात शंकराने दिलेले एक वस्त्र दिले होते त्यामुळे होळीकाचे अग्नीपासून संरक्षण होत होते.

परंतु प्रल्हाद आणि होळीका जेव्हा सरणावर बसतात तेव्हा प्रल्हाद देखील विष्णुची भक्ती करतो त्यामुळे विष्णु जोराची हवा निर्माण करतात त्यामुळे होळीकाच्या अंगावरील कापड उडून प्रल्हाद यांच्या अंगावर जाते. आणि होळीका जळते आणि प्रल्हाद वाचतो अशी ही कहाणी आहे. म्हणून आपण दरवर्षी होळीका दहण करतो. या गोष्टीवर अनेक तर्क निर्माण होतात. परंतु अजूनही ह्या तर्कावर कोणीच चर्चा का करत नाही आपण जास्त खोलवर चर्चा न करता ढोबळमानाने चर्चा करू जर होळीकाला शिव अर्थात शंकर हे स्वतः अग्नीपासून संरक्षण होण्याचे वस्त्र देतात याचाच अर्थ होळीका चांगली होती म्हणून तर शिव अर्थात शंकराने तिला संरक्षणासाठी कापड दिले. दुसरा तर्क शिव शंकरापेक्षा विष्णु जास्त ताकतवान होते हे तर या कथेमधुन दाखवायचे नाही ना? कारण विष्णुच्या भक्तीमुळे जोराची हवा येते अग्नीपासून संरक्षण करणारे वस्त्र हे प्रल्हाद च्या अंगावर जाते.

तिसरा तर्क वस्त्र अनेक असतील पण एकच वस्त्र जे होळीकाला दिले तेच तिचे संरक्षण करणार होते म्हणजे काही खास मंत्र वा आजच्या भाषेत आपण पासवर्ड म्हणु ज्यामुळे होळीकाचे संरक्षण होईल अशी व्यवस्था करून दिली असेल. पासवर्ड फक्त समजण्यासाठी घेऊ या कारण आज पासवर्ड मुळे संरक्षण होते हे जाणीव सर्वाना आहे. मग होळीकाचा पासवर्ड प्रल्हादसाठी कस काय कामी आला? आज डॉक्टर आजर एक असला तरी व्यक्ती बघुन औषधी सुद्धा वेगवेगळ्या देतो मग होळाकासाठी असलेले वस्त्र प्रल्हाद साठी कस काय कामी आले.

एक गोष्ट मनाला टोचणारी आहे ती म्हणजे शिव अर्थात शंकर हे कधीच कोणाला प्रसन्न होत नव्हते परंतू रावणाला प्रसन्न होत होते. रावण हा शंकराचा सर्वोत्तम भक्त होता. रावणाकडे सुख संपती आणि ताकद खुप होती त्याचे मरण कशात आहे हे शत्रुलाही माहिती नव्हते तरीही रावणाची हत्या केली जाते. होळीकाला शिव शंभर स्वतः अग्नीपासून संरक्षण व्हावे म्हणून वस्त्र दिले जाते तरीही ती जळते. यादोन्ही मध्ये साम्य आहे ते म्हणजे शंकराचा आशिर्वाद दोघांवरही होता. आणि याच दोघांना दहण करून आनंदोत्सव साजरा केला जातो. यावर चर्चा, तर्क होऊन मुळ मुद्दा शोधुन काढायला पाहिजे. कारण दोन्ही बाबी खुपच गंभीर आहेत.

अजून एक तर्क संबंध गोष्टीवरून असे लक्षात येते हा वाद घरगुती होता मग याचा आनंदोत्सव सामाजिक का? आणि तोही स्त्रिला जाळून? बर होळीमध्ये वाईट गोष्टी चे दहण करतो म्हणतात मग देशात बॉम्ब स्फोट करणारे वाईट नाही का? देशातील महिलांवर बलात्कार करणारे वाईट नाहीत का? देवा धर्माच्या नावाखाली लोकांची लुट करून मानसिक भिती निर्माण करणारे वाईट नाहीत का? मग आज अशा लोकांना पाठीशी घातले जाते त्यांच्या साठी रस्त्यावर उतरले जाते. आणि दुसरीकडे एका स्त्रिला जाळून आनंदोत्सव साजरा करून वाईटाचा जाळले असे दाखवले जाते.

खरचं वाईट सर्व जळाले का? जर सत्याची बाजु घेणे, महिलांचा सन्मान करणे आमची संस्कृती असेल तर भ्रष्ट लोकांना पाठीशी घालणे महिलांचा मान सन्मान न करणे ही संस्कृती कोणाची आहे हे ओळखून आपण आपले आचार व विचार वेळेनुसार काळानुसार बदलणे आवश्यक आहे तरच आपण सुशिक्षित, सज्ञान आणि विज्ञानवाद समाजाची जडण घडण करू शकु. विनोद पंजाबराव सदावर्ते समाज एकता अभियान रा. आरेगांव ता. मेहकर मोबा: ९१३०९७९३००