HBP-Dr-Jalal-Maharaj
अकोला

संतांच्या संदर्भात तर्क करणे असंगत -हभप डॉ जलाल महाराज

गायत्री नगरातील किर्तन महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

अकोला: समाजात संतांच्या बद्दल शंका कुशंका व तर्क घेतल्या जातात. जगद्गुरु तुकोबाराय यांच्या वैकुंठ गमनच्या संदर्भातही अनेक तर्क वितर्क जोडल्या गेले आहेत. मात्र गाथेत याचा सर्वकष उहापोह करण्यात आला असून संतांविषयी तर्क होता कामा नये.

कारण तुकोबाराय हा विषयच सर्वात मोठा असून तो निश्चित निखळ भक्तीची नांदी असल्याचा हितोपदेश वारकरी संप्रदायातील मुस्लिम कीर्तनकार नाशिक येथील हभप डॉ जलाल महाराज सय्यद यांनी केले.संत जगद्गुरू तुकाराम महाराज बीजोत्सव सेवा समितीच्या वतीने स्थानीय कौलखेड रस्त्यावरील गायत्री नगर येथील गायत्री नगर प्रांगणात गुरुवार पासून सुरू झालेल्या कीर्तन महोत्सवात हभप जलाल सय्यद कीर्तन करीत होते.

हभप भागवताचार्य प्रशांत महाराज ताकोते यांच्या मार्गदर्शनात साकारण्यात आलेल्या या कीर्तन महोत्सवात कीर्तनाचे प्रथम पुष्प गुंफतांना हभप जलाल महाराज सय्यद यांनी तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमनाचा अभंग प्रतिपादित केला.

ते म्हणाले, तुकारामांनी कोणत्याही क्लिष्ठ मार्गाचा अवलंब न करता साध्या व सरळ भक्तीने भगवंतांना प्रसन्न करून घेतले.त्यांच्या भक्तीची महिमा ही अगाध असून भक्तीने भव सागर पार करता येतो.,ज्ञानाच्या अनेक प्रकारानेही भक्ती चांगल्या पद्धतीने करता येत नाही.ज्ञानही काही प्रमाणात भक्तीच्या आड येत असते.हा मार्गही प्रभू प्राप्तीसाठी काही सहज नसल्याचे तुकोबाराय मानीत असल्याचे हभप जलाल महाराज यांनी सांगितले.

ते म्हणाले, तुकोबारायांनी कलियुगाची महिमा ओळखून साध्या सरळ नाम स्मरणाचा अवलंब केला.भक्ती ही स्वरूपाचे दर्शन घडविते.भक्ती ही मोक्षाचे मूळ कारण आहे. एखाद्या गोष्टीची अनुभूती आली तर प्रमाणसिद्धता होत असल्याचे त्यांनी सांगितले.ते म्हणाले,बुद्धी मन व चित्त ही कल्पनेची क्षेत्रे आहेत.कल्पनेतून भास निर्माण होतो.

दिसणारी वस्तू असू शकेल असे नाही,मात्र ती सत्य आहे की नाही याचीही शाश्वती देता येत नसल्याचे त्यांनी सांगून ब्रह्म जरी दिसत नसले तरी ती वास्तविकता आहे.आणि जग जरी दिसत असले तरी ती वास्तविकता नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कीर्तन प्रारंभी शेगाव येथील ज्ञानेश्वर महाराज मिरगे यांचे संत साहित्यावर उद्बोधन झाले.दरम्यान हभप जलाल महाराज यांचे समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. प्रास्तविक आशिष कसले यांनी केले.

शुक्रवार दि १७ मार्च पर्यंत नित्य रात्री ८ ते रात्री १० पर्यंत चालणार्‍या या कीर्तन महोत्सवात दि ११ मार्च रोजी हभप अशोक महाराज इलग शास्त्री शेवगाव, दि १२ मार्च रोजी हभप गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री डोंगरगण,दि १३ मार्च रोजी हभप चकोर महाराज बाविस्कर पारोळा, दि १४ मार्च रोजी सोपान महाराज काळपांडे मूर्तिजापूर,दि १५ मार्च रोजी हभप जगन्नाथ महाराज पाटील मुंबई, दि १६ मार्च रोजी वारकरी भूषण हभप उमेश महाराज दशरथे परभणी यांचे कीर्तन होऊन दि १७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता गुरुवर्य हभप स्वामी महाराज बीड यांच्या काल्याच्या किर्तनाने या किर्तन महोत्सवाची पूर्णाहुती होणार आहे या कीर्तन महोत्सवाचा समस्त महिला पुरुष भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन संत जगद्गुरू तुकाराम महाराज बीज सेवा समिती,गायत्री नगरच्या समस्त पदाधिकारी व सेवाधार्‍यांनी केले.