वीज वितरण कंपनीचा बेजबाबदार पणा चव्हाट्यावर!
अकोला प्रतिनिधी९ सप्टेंबर:-तेल्हारा तालुक्यातील रायखेड येथील४५वर्षीय शेतमजुरी करणाऱ्या महिलेचा तुटलेल्या तारेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना,९सप्टेंबरच्या सकाळी घडली.वीज वितरण कंपनीच्या कंपनीने तुटलेला विद्युत तार वेळेत न जोडल्याने, एका गरीब शेतमजूरी करणाऱ्या महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. या दुःखद घटनेमुळे वीज वितरण कंपनीचा बेजबाबदार पणा चव्हाट्यावर आला आहे. सौ सीमा गजानन वानखडे, रा.रायखेड.ता.तेल्हारा, जि. अकोला असे शॉक लागून मृत्यू झालेल्या शेतमजूर महिलेचे नांव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की,संपूर्ण महाराष्ट्रासह अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतीसह घरांच्या पडझड झाली आहे. अशातच तेल्हारा तालुक्यातील ग्रामीण वीज वितरण कंपनी कार्यालय आर-२ अंतर्गत येत असलेल्या रायखेड येथील वीज वितरण कंपनीच्या पोलची तार गेल्या दोन दिवसांपूर्वी तुटून जमिनीवर पडली होती. याची माहिती सरपंच यांच्यासह गावातील नागरिकांनी,नमूद उपकेंद्राचे शाखा अभियंता गोठवाड आणि या उपकेंद्रावर नियुक्ती असलेले लाईनमन चहाजगुणे यांना,दिली होती. विशेष म्हणजे तार तुटलेली असतांना शाखा अभियंता गोठवाड आणि लाईन मन चहाजगुणे थकीत वीज बिलाची रक्कम वसुली साठी गावात आले होते.असा आरोप रायखेडच्या सरपंच सौ. स्वाती नेमाडे यांनी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अभियंता अकोट यांना दिलेल्या तक्रारीमध्ये केला आहे. गावकऱ्यांनी तुटलेल्या वीज वाहिनीची दुरुस्ती करून जोडणी केली असती तर दुर्दैवी सीमा वानखडे यांचा मृत्यू झालाच नसता,अशी माहिती समोर आली आहे. शिवाय वीज वितरण कंपनीच्या परिपत्रकानुसार ज्या लाईनमनची नेमणूक ज्या उपकेंद्रामध्ये आहे,त्या कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी राहणे बंधनकारक आहे. असे असूनही चहाजगुणे मुख्यालयी राहत नसल्याची खात्रीलायक माहिती दैनिक राजयोन्नतीच्या हाती आली आहे. एकंदरीतच मयत सीमा गजानन वानखडे शेतमजूर महिलेचा हा शॉक लागून झालेल्या मृत्यूला वीज वितरण कंपनी चे आर-२ तेल्हारा उपकेंद्राचे शाखा अभियंता गोठवाड आणि लाईनमन चहाजगुणे यांच्या हलगर्जीपणा मुळे झाला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.वीज वितरण कंपनीचे अकोट विभागाचे कार्यकारी अभियंता मागासवर्गीय शेतमजुरी करणाऱ्या सीमा वानखडे या महिलेच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या शाखा अभियंता गोठवाड आणि लाईनमन चहागुणे यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.