अकोला: सेंट पॉल पब्लिक स्कूल अकोट येथे दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित शिवजयंती उत्सव समारोहात इतिहास अभ्यासक श्री संतोष झामरे यांनी विचार व्यक्त करतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंगांना आजही राष्ट्रीय ऐक्यासाठी, सामाजिक सद्भाव वृद्धिंगत करण्यासाठी किती महत्त्व आहे, ते पटवून दिले.
शिवरायांनी सर्वात प्रथम मध्ययुगात जवळपास साडे तीनशे वर्षापूर्वी ह्या देशात विविध छोट्या छोट्या प्रदेशात विभागलेल्या राजसत्तांना, त्या राज्यातील सामान्य रयतेला एक राष्ट्र ह्या धाग्यात विणण्याचे महान कार्य केले.शिवरायांनी परकीय जुलमी मोगली सत्तेला मायभूमीवर जीवापाड प्रेम करणार्या स्वातंत्र्य वीरांच्या बळावर रयतेच स्वराज्य निर्माण केले. जे प्रत्येकाला स्वतःच वाटत होतं. हा लोकशाहीचा प्रयोग होता.असे विचार आपल्या शिवव्याख्यानातून श्री संतोष झामरे व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा श्री नवनीत लखोटीया होते,तर प्रमुख अतिथी म्हणून श्री प्रमोद चांडक, सौ शारदा ताई लखोटीया होते.यावेळी संस्थेचे प्राचार्य श्री विजय बिहाडे सर यांनी सुद्धा शिवचरित्रातील काही प्रसंगांना उजाळा देऊन आपली संस्था नावलौकिकास कशी पात्र ठरेल हा कानमंत्र आपल्या सहकार्यांना आणि विद्यार्थ्यांना दिला.
ह्यावेळी विद्यार्थ्याच्या वक्तृत्व स्पर्धा आणि किल्ले बनवा स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. काही मुलांनी बाल शिवबा आणि राजमाता जिजाऊ यांच्या सारख्या वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.