अकोला: वाढदिवस म्हणजे आनंदाचा क्षण. यापूर्वी आपण व्यक्ती, संस्थेचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याचे ऐकले आहे. पण अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचा ६४ वा वाढदिवस उत्साहात साजरा केला.? या उत्सवात विद्यार्थ्यांना विविध खाद्य पदार्थांची मेजवानी मिळाली.
बार्शीटाकळी पंचायत समितीअंतर्गत शेलू खुर्द जि. प. प्राथमिक शाळेचा वाढदिवस शनिवारी विद्यार्थ्यानी अभिनव पद्धतीने साजरा केला. शाळेच्या वाढदिवसानिमित्ताने सकाळच्या सत्रात बाल आनंद मेळाव्याचेआयोजन करण्यात आले होते. गावकर्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे बालआनंद मेळावा यशस्वी झाला आणि चिमुकल्यांच्या चेहर्यावर आनंद पसरला.बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शेलु खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच गोपाल महल्ले यांनी केले.
दरम्यान या कार्यक्रमात विद्यार्थी आणि गावकर्यांना अनेक चविष्ट खाद्यपदार्थांची मेजवानी मिळाली. सायंकाळी सात वाजता स्नेहसंमेलन सोहळ्यातील प्राप्त बक्षिसाचे शाळेच्या वाढदिवसानिमित्त वस्तूरूपाने वाटप करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना स्टडी टेबल, व्हाइट बोर्ड व वॉटर बॉटलचे वाटप करण्यात आले.
बक्षीस वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक अमोल गोंडचवर, संचालन समर्थ होनाळे विद्यार्थ्याने केले. बक्षीस वितरण सोहळ्यानंतर बहारदार हास्य-प्रबोधनपर कार्यक्रम इचूकाटा यात वर्हाडी कवी राजाभाऊ देशमुख, चोहोट्टा येथील प्रशांत वरईकर, अकोला येथील प्रशांत भोंडे, शिक्षक धीरज चावरे, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीच्या अभ्यासक्रमात दोन कविता समाविष्ट असणारे कवी वैभव भिवरकर, शेलू खुर्द शाळेतील शिक्षक अमोल गोंडचवर यांनी सहभाग घेतला.
सूत्रसंचालन आदर्श शिक्षक गोपाल खाडे, आभार शिव व्याख्याते प्रतीक महल्ले यांनी मानले. माजी सरपंच उल्हास महल्ले व शा.व्य.स.अध्यक्ष संदीप महल्ले यांच्या उपस्थितीत सोहळ्याची सांगता करण्यात आली.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलु खुर्दचा ६४ वा वाढदिवस इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या हातून केक कापून साजरा करण्यात आला.
बक्षीस वितरण सोहळ्याला अध्यक्ष म्हणून निसर्ग कट्ट्याचे संस्थापक अमोल सावंत आणि प्रमुख अतिथी म्हणून उपक्रमशील शिक्षक मनोज लेखनार उपस्थित होते. सरकारी शाळेतील उत्साहाच्या वातावरणाबद्दलअध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थी शिक्षक व गावकरी मंडळींचे अभिनंदन केले.