बाळापूर : राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेचे माध्यमिक शिक्षक मोहन यशवंत शिरसाट यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण समारंभ २४ फेब्रुवारी रोजी रंगशारदा सभागृह ,बांद्रा,मुंबई येथे संपन्न झाला आहे.
या प्रसंगी आमदार कपिल पाटील, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे,उच्च व माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील,प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद गोसावी आणि विद्या प्राधिकरणचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर इ.मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.मोहन शिरसाट यांचे मूळ गाव अकोला जिल्हा बाळापूर तालुक्यातील कान्हेरी गवळी हे आहे.मराठी माध्यमातील कन्या शाळेत ३५वर्षापासून अध्यापन करताना त्यांनी विद्यार्थीकेंद्री प्रयोगशीलतेकडे विशेष लक्ष दिले आहे.शिक्षामुक्त बालस्ननेही शिक्षण ही भूमिका घेऊन त्यांनी कार्य केले आहे.
‘अॅ आणि ‘आॅ’ या इंग्रजीतून आलेल्या स्वरांची शिफारस त्यांनी २००४ मध्ये शासनाकडे केली होती आणि ती स्वीकारली गेली आहे.ते मराठी विषयाचे शिक्षक असून मराठी माध्यमातून मुलींचे शिक्षण यावर त्यांचा भर आहे. बालभारती मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले.
ते उपक्रमशील शिक्षक तथा कवी म्हणून ख्यात आहेत.’बोलकी भिंत ‘ या विशेष उपक्रमातून शाळेत सर्जनशीलता आणण्याचा प्रयत्न केला.ते फुले -आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते असून वाशीम येथील २००१ मध्ये आयोजित राज्यस्तरिय फुले -आंबेडकरी साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक होते.वाशीम येथील अस्मितादर्श साहित्य संमेलन आयोजनात सहभाग होता..शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे.