अरब देशांसाठी भारत हा अन्नधान्याचा सर्वांत मोठा पुरवठादार देश ठरला असून, एकंदर निर्यातीत कृषी उत्पादनांचा टक्काही वाढला आहे. कोरोना काळात देशाच्या समग्र निर्यातीत सात टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली, तेव्हा अन्नधान्याची निर्यात वाढली, हे चांगले लक्षण आहे.
आखाती देशांनी ब्राझीलऐवजी भारताला पसंती देणे हाही चांगला संकेत आहे. गेल्या पंधरा वर्षांत प्रथमच भारत २२ अरव देशांच्या लीगसाठीचा सर्वांत मोठा अन्नधान्य पुरवठादार देश बनला आहे. आखाती देशांकडून गेल्या वर्षी आयात केल्या गेलेल्या एकूण कृषी आणि व्यापारी उत्पादनांमध्ये भारताचा वाटा ८. २५ टक्के आहे. ब्राझीलची हीच टक्केवारी ८. १५ असून, भारताचा वाटा त्याहून अधिक ठरला आहे. अरव ब्राझील चेंबर ऑफ कॉमर्सच्या म्हणण्यानुसार, अरव जगतासाठी ब्राझील हा आधीपासूनच एक महत्त्वपूर्ण भागीदार देश आहे. परंतु, दोन्ही ठिकाणांमधील भौगोलिक अंतर हा मुख्य अडथळा ठरला आहे.
कोरोना महामारीमुळे जागतिक पुरवठा साखळीत अडथळे आले. त्यामुळे अन्नधान्य उत्पादने एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचविणे अवघड बनले. भारताकडून अरब देशांना फळे, भाज्या. साखर, अन्नधान्य आणि मांसाचा पुरवठा केला जातो. हा पुरवठा भारत केवळ एका आठवडयात करू शकतो. तर हाच पुरवठा करण्यासाठी ब्राझीलला मात्र दोन महिने लागतात.
सागरी मार्गामध्ये विशेषतः भारत, तुर्की, अमेरिका, फ्रान्स आणि अर्जेंटिनाकडून निर्बंध आल्यामुळे ब्राझीलच्या व्यापारविषयक आव्हानांमध्ये वाढ झाली आहे आणि त्याचा थेट फायदा भारताला मिळाला आहे. महामारीच्या काळात चीनने स्वतःच्या अन्नधान्य साठवणूक क्षमतेत वाढ केली. त्यामुळेही ब्राझीलच्या अरब देशांबरोबर सुरू असलेल्या व्यापारातील काही भागांवर परिणाम झाला. कंपन्यांना भारतीय शेतकन्यांशी जोडून घेण्यासाठी व्यापारी व्यासपीठांची सुरुवात केली आहे. महामारीत ज्या प्रकारे पुरवठा साखळी विखंडित झाली होती, त्यातून धडा घेऊन आखाती देश अन्नसुरक्षा मजबूत करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.
अँग्रीयोटा हा दुबईच्या मल्टिकमोडिटिज सेंटरचा प्लॅटफॉर्म म्हणजे व्यापार सुगमतेसाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांचाच एक प्रयत्न आहे. भारतीय वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातून होणाऱ्या कृषी मालाच्या निर्यातीत २०२०-२१ मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतात जेव्हा समग्र निर्यातील सात टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली, त्या काळात झालेली ही वाढ आहे. २०२०-२१ मध्ये शेतमालाच्या निर्यातीत ३२. ५ अब्ज डॉलरपर्यंत वाढ नोंदविण्यात आली आहे. २०१२-१३ मध्ये ३२.७ अब्ज डॉलरची विक्रमी निर्यात झाली होती. त्या आकडयाच्या आसपास यावर्षीचा आकडा पोहोचला आहे. एकूण निर्यातीत कृषीमालाचा हिस्सा ११ टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे आणि हाही विक्रमी स्तरच ठरला आहे.
भारतीय शेतीसाठी हे सुखद संकेत ठरणार आहेत. सध्या प्रक्रिया केलेल्या विविध अन्नधान्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जात आहे. २०२२ मध्ये शेतीमालाच्या निर्यातीचे ६० अब्ज डॉलरचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत सरकारकडून वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. परिणामी, कृषी आणि प्रक्रियाकृत उत्पादनांच्या भावांमध्ये उत्साहवर्धक वृद्धी झाली आहे. उच्चतम आर्थिक वृद्धी आणि चांगला नफा या दृष्टीने हे उत्तम संकेत आहेत. शेतीचे क्षेत्र भारताची पोषणाची गरज पूर्ण करण्याबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास सक्षम आहे; मात्र त्यासाठी अन्नधान्य आणि संबंधित क्षेत्रांसाठी सुविधा, व्यापारात सूट आणि गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळण्याची आवश्यकता आहे.