अकोला: भाजपचा केवळ शिवसेनेच्या मतदाससंघातील विकास कामांना विरोध असून, ६० टक्के काम झालेल्या ६९ गावे पाणी पुरवठा योजनेला स्थगिती देत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गलिच्छ राजकारण केले, अशी टिका ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
राजकारण करून जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याच्या निषेधार्थ आपण मंगळवारी विधिमंडळाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उपोषण करणार असून, अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ५ हजार ग्रामस्थ आंदोलन करतील, असाही इशारा त्यांनी दिला.खारपाणपट्यातील गावांसाठी वरदान ठरणार्या व शिवसेना आग्रही असलेल्या ६९ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला शिंदे-फडणवीस सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. योजनेला वान प्रकल्पातून पाणी पुरवठा होणार असून, याला काही ग्रामस्थांनी विरोध केला आहे.
दरम्यान बाळापूरचे आमदार देशमुख यांनी भाजपवर निशाणा साधला. वानमधून शेगाव, जळगाव जामोद येथेही पाणी पुरवठा होतो. मात्र त्या ठिकाणी भाजपचा आमदार असून, बाळापूर येथे मात्र शिवसेनेचा आमदार असल्यानेच भाजपचे विरोध करीत आहे.तत्कालीन ठाकरे सरकारने मंजूर केलेल्या पाणी पुरवठा योजनेलाच स्थगिती देत ग्रामस्थांना तहानलेले ठेवण्यात येत आहे. स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणून घेणार्या शिंदे-फडणवीस सरकराला ग्रामस्थ हे हिंदू दिसत नाहीत काय, असा सवाल त्यांनी केला.पत्रकार परिषेदला गजानन दाळू गुरुजी, सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथोड, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, पूर्वचे अध्यक्ष राहुल कराळे, पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा, विकास पागृत, उमेश जाधव आदी होते.६० गावे पाणी पुरवठा योजनचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही सरकारने स्थगिती दिली. योजनेची किंमत २१९ कोटी रुपये असून, प्रत्यक्ष योजनेवर १९२ कोटी रुपये खर्च होणार आहेत.
त्यापैकी १०८ कोटी रुपये खर्च झाले असून, कंत्राटदाराला ९२ कोटीचे देयकही अदा करण्यात आले आहे. असे असनाताही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी योजनेला स्थगिती देत स्वत:ची बौद्धिक दिवाळखोरीच जाहीर केली, अशी टीका आ.. देशमुख यांनी केली.प्रत्यक्ष वान प्रकल्पासाठी तेल्हारा तालुक्यातील शेतकर्यांची जमीन अधिगृहित झालेली नाही, असे आमदार देशमुख म्हणाले. मात्र शेतकर्यांच्या नावाखाली चार-पाच भाजप कार्यकर्त्यांनी पाणी आरक्षणाला विरोध केला आणि अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पत्र दिल्याने योजनेला स्थगिती देण्यात आली. आता मंगळवारी शेकडो ग्रामस्थांकडून होणार्या आंदोलनाची दखल पाण्यावरूनही राजकारण करणारे शिंदे-फडणवीस सरकार घेईल काय, असा सवाल आमदार देशमुख यांनी केला.