राजकीय

बपोरी गटात भाजप आणि महाविकास आघाडीत सरळ लढत

अजय प्रभे

मूर्तिजापूर४ऑक्टोबर:-जिल्हा परिषदेत एकेक टर्म यशस्वीरित्या पूर्ण करणारे दोन उमेदवार मूर्तिजापूर तालुक्यातील बपोरी गटात समोरासमोर आहेत. या गटात चार उमेदवार निवडाणूक लढवित आहेत, परंतु भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मायाताई रामदासजी कावरे आणि महाविकास आघाडीच्या संजना सागर कोरडे यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे चित्र आहे. मायाताईच्या प्रचाराची धुरा त्यांचे चिरंजीव डॉ.अमित कावरे यांच्या खांद्यावर आहे. डॉ.अमित यांचा जनसंपर्क दांडगा आहे. खासदार संजय धोत्रे, आमदारद्वय रणधीर सावरकर व हरीष पिंपळे यांच्या विश्वासातील ते आहेत. बपोरीच नव्हे,शतर संपूर्ण मूर्तिजापूर तालुक्याच्या राजकारणावर त्यांची भक्कम पकड आहे. त्यांच्या मातोश्री विद्यमान बपोरी गटातील भाजपा उमेदवार मायाताईंनी गेल्या वेळी लाखपुरी गटाचे प्रतिनिधित्व करतांना कामांचा प्रचंड उपसा केला आहे. विकास कामांची गंगोत्री लाखपुरी गटात आणली आहे, त्यामुळे त्यांचे पारडे जड आहे.महाविकास आघाडीच्या उमेदवार संजनाताई सागर कोरडे यांनी यापूर्वी एकदा जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाच्या कारकिर्दीत उल्लेखनीय विकासकामे केली आहेत. आमदार नितीन देशमुख, आमदार अमोल मिटकरी यांचा त्यांना भक्कम पाठिंबा आहे. राज्यात सत्ता असल्यामुळे निधी खेचून आणणे त्यांना सहजशक्य आहे. भक्कमपणे त्यांच्या पाठीशी असणारे राजेंद्र कोरडे काँग्रेसचे नेते आहेत नागपुरातून त्यांची वरिष्ठ नेतृवासोबत उठ बस आहे. त्यांचा सर्वपक्षीय संपर्कही दांडगा आहे. त्यांच्या हिवरा कोरडे गावात त्यांनी मोठी विकासकामे केली आहेत. त्यामुळे तुल्यबळ असणाऱ्या या दोन उमेदवारांध्ये सरळ लढत होऊन मतदारांचा कौल कुणाला मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.