क्राईम

नदीत उडी मारून दीर-भावजयची आत्महत्या! एक महिन्यापासून होते बेपत्ता!

यवतमाळ३सप्टेंबर:-यवतमाळ येथून गेल्या एक महिन्यापासून पलायन करून,बेपत्ता असलेल्या दीर-भावजयच्या जोडप्याने मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या महागाव ते माहूर रोडवरील धनोडा गावातील पैनगंगा नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हेमंत राजेंद्र चिंचोळकर ३१वर्षे आणि सोनाली संदीप चिंचोळकर वय२८वर्षे रा.यवतमाळ असे आत्महत्या केलेल्या दीर-भावजयच्या जोडप्याचे नांव असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की यवतमाळ जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील रहिवासी असणारे हेमंत आणि त्यांची वहिनी सोनाली मागील एक महिन्यांपासून बेपत्ता होते. याबाबत कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रारही दिली होती. सध्या धनोडा येथील पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान रात्री आठच्या सुमारास एका महिलेनं आणि पुरुषानं पुलावरून उडी घेतल्याचं काही प्रवाशांनी पाहिलं. त्यांनी त्वरित याची माहिती धनोडा येथील रहिवाशांना दिली. घटनेची माहिती मिळताच काही गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच काहींनी याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. यावेळी पोलिसांना पुलावर पर्स, चपला, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि एटीएम कार्ड आढळलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे. संबंधित दीर भावजयीनं नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.