पश्चिम महाराष्ट्र

तहसीलदार ज्योती देवरे यांच्याअडचणीत वाढ,सामाजिक कार्यकर्त्यांनी केली लोकायुक्तांकडे तक्रार

 अहमदनगर३१ऑगस्ट: आपण केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची कोणी हिम्मत करू नये, यासाठी आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या अण्णा हजारे यांच्या पारनेर तालुक्यातील  तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध स्थानिक कार्यकर्त्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केल्याने, देवरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशी आणि अन्य प्रकरणांच्या आधारे भ्रष्टाचार केल्याची तक्रार पारनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी दाखल केली आहे. देवरे यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनातून अद्याप मार्ग निघालेला नाही. त्यांच्याविरुद्धच्या चौकशीचे निर्णयही प्रलंबित आहेत. त्यातच आता थेट लोकायुक्तांकडे तक्रार दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.पारनेर तालुक्यातील राहुल झावरे, संदीप चौधरी, ज्ञानेश्वर लंके व सुहास सालके यांनी ज्योती देवरे यांच्याविरुद्ध लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यांच्यावतीने पुण्यातील अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. अजित देशपांडे व अ‍ॅड. अक्षय देसाई यांनी ही ऑनलाइन याचिका सोमवारी दाखल केली आहे. महाराष्ट्राच्या लोकायुक्त पदावर नुकतीच न्यायमूर्ती विद्याधर कानडे यांची नियुक्ती झाल्यानंतर दाखल झालेले हे पहिलेच मोठे प्रकरण ठरले आहे. याचिकेत देवरे यांच्यावर तक्रारदारांनी अनेक आरोप केले आहेत. स्वतःच्या लोकसेवक पदाचा गैरवापर करून व्यक्तिगत हितासाठी, भ्रष्ट हेतुने अनेक पातळ्यांवर भ्रष्टाचार करणे, वाळूमाफियांना परस्पर कारवाईमुक्त करणे, बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांचे ट्रॅक्टर, डम्पर, जेसीबी मशीन्स व पोकलेन अशी वाहने कोणतीही तडजोड शुल्क सरकारला जमा न करता परस्पर सोडून देणे अशा अनेक प्रकरणात ज्योती देवरे यांनी तब्बल पाच कोटी, ९४ लाख रुपयांच्यावर घोटाळा केला आहे, असा आरोप लोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. यासंबंधी अनेक पुरावे याचिकेसोबत जोडण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या चौकशीच्या अहवालाचाही आधार घेण्यात आला आहे. नगरच नव्हे तर धुळे येथे कार्यरत असतानाच्या काळातील तक्रारींचाही यामध्ये समावेश आहे.यासंबंधी याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. सरोदे म्हणाले, ‘हे अतिशय दुर्दैवी आणि विरोधाभासी चित्र आहे की देवरे या सध्या ज्या तालुक्यामध्ये कार्यरत आहेत त्याच तालुक्यात समाजसुधारक आणि भ्रष्टाचार विरोधातील अग्रगण्य व्यक्तिमत्व अण्णा हजारे यांचे गाव राळेगणसिद्धी देखील आहे. हजारे हे लोकपाल आणि लोकायुक्त कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी व भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी लढत आहेत. लोकसेवेत असलेल्या व्यक्तीला भरमसाठ पगार असून सुद्धा, बरेच लोकसेवक  विविध मार्गांनी भ्रष्टाचार करून,जनतेचीआर्थिक लूट करीत असतात.ज्योती देवरे यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून केलेल्या अपहाराची चौकशी करून,त्यांची खातेनिहाय चौकशीची मागणी लोकायुक्त कडे केलेल्या तक्रारीत मागणी करण्यात आली आहे