अमरावती : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नवनीत राणा मधल्या काही दिवसांपासून राजकीय बातम्यांपासून दूर होत्या. परंतु, आज त्यांनी वारीत सहभाग दाखवला.यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळावं म्हणून माऊलीकडे साकडं घातलं असल्याचं नवनीत राणा म्हणाल्या.माजी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा हे वाखरी आणि भंडीशेगाव दरम्यान पायी वारीत सहभागी झाले होते.
— Navnit Ravi Rana (@navneetravirana) July 13, 2024
“लोकसभा निवडणुकीच्या काळात खोटा प्रचार केला गेला. खोटं जास्त दिवस चालत नाही. सत्य हे सत्य असतं. येणाऱ्या भविष्यात खोट्याचा प्रचार करणाऱ्यांना धडा नक्की शिकवणार आहे”, असं नवनीत राणा विरोधकांना म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, “महायुतीचं सरकार येण्यासाठी माऊलीच्या दर्शनाला आम्ही आलो आहे. महायुतीचं सरकार पुन्हा बसावं म्हणून आम्ही साकडे घालतो आहे.”आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तुमच्या नावाला विरोध होतोय, असा प्रश्न विचारला असता नवनीत राणा म्हणाल्या, “मी भाजपाची कार्यकर्ता आहे, रवी राणा हे महायुतीचे घटकपक्ष म्हणून गेल्या १० वर्षांपासून मोदींबरोबर आहेत, त्यामुळे मी त्यांच्याबरोबर काम करणार आहे.”