टीम, दैनिक राज्योन्नती
छत्तीसगड : छत्तीसगडच्या बालोदा बाजार-भाटापारा येथे गुरुवारी रात्री मोठी दुर्घटना घडली असून पिकअप वाहन आणि ट्रकच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर या अपघातात जवळपास 20 जण जखमी झाले आहेत. भाटापाराचे एसडीओपी सिद्धार्थ बघेल यांनी ही माहिती दिली.
बालोदाबाजार-भाटापारा रस्त्यावरील खमारिया परिसरात हा भीषण अपघात झाला. खिलोरा येथून साहू कुटुंबातील लोक पिकअप वाहनाने अर्जुनी येथे गेले होते, ते परत येत असताना पिकअप व ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 20 हून अधिक जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व लोक एकाच कुटुंबातील असून काही कौटुंबिक कामानिमित्त खिलोरा येथून अर्जुनी गावात गेले होते. मृतांमध्ये चार मुलांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 10 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर 3 गंभीर जखमींना रायपूरला रेफर करण्यात आले आहे.