अकोला

गारपिटीने दोन तालुक्यांत ५२८ हेक्टर फळबागा,पिकांची हानी

अकोला: पातूर तालुक्यात शनिवारीही काहीठिकाणी गारपीट व पाऊस झाला. त्यामुळे फळबागा व रब्बी हंगामातील पिकांचे दुसर्‍या दिवशीही नुकसान झाले. दरम्यान पातूर व बार्शीटाकळी तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे फळबाग, रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानाचा अहवाल शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्त कार्यालयात पाठवण्यात आला.

या पावसामुळे पातूर व बार्शीटाकळी तालुक्यातील ४१९ शेतकर्‍यांचे ५२८हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात गत खरीप हंगामात जून ते सप्टेंबर दरम्यान प्रचंड पाऊस झाला होता. परिणामी खरीप हंगामातील उत्पादन प्रचंड घटले होते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाचाही पिकांना फटका बसला होता. खरीप हंगामातील हे नुकसान रब्बी हंगामात भरून काढू,

असा निर्धार करीत शेतकरी कामाला लागले होते. मात्र संध्याकाळी बार्शीटाकळी व पातूर तालुक्यात काही ठिकाणी वादळी वार्‍यासह पाऊस व गारपीट झाली होती. शनिवारी पातूर तालुक्यात सायंकाळी आलेगाव परिरसात पाऊस झाला. आलेगाव ते डोंगरगाव मार्गावर गारपीट झाली. पांगरताटी, उमरा, राहेर अडगाव, उमरवाडी, पिंपळडोली, नवेगाव, चोंढी, पांढुर्णा, चिखलवाड, उमरवाडी, पाचरण, दधम, पहाडसिंगी, गावंडगाव या परिसरात पाऊस झाला.

रस्त्यावर गाराचा खच साचला होता. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, हरभरा, भुईमूग, संत्रा, टरबुज, मोसंबी, मूग, पपई पिकांची हानी झाले आहे. शेतात सोंगून ठेवलेला हरभरा व गहू पावसामुळे भिजला आहे. संत्रा, मोसंबी, पपई या फळबागांना वादळी वार्‍यांचा फटका बसला आहे. पातूर तालुक्यात शुक्रवारी १६.३ मिमी पाऊस झाला. त्यामुळे २८७ शेतकर्‍यांचे अंदाजे ३७४ हेक्टरवरील पिकांची हानी झाली. बार्शीटाकळी तालुक्यात ५.८ मिमी पाऊस झाला. त्यामुळे १५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, तर १३२ शेतकर्‍यांना गारपीट, अवकाळी पावसाचा फटका बसला.