अर्थ

उद्योजक, व्यापाऱ्यांना काहीही कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

मुंबई : उद्योजक, व्यापारीस्नेही सरकार आहे. त्यांच्यासाठी काहीही कमी पडू देणार नाही. उद्योगाला काय हवे आहे, हे सरकारला माहिती आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री अॅग्रीकल्चरने राज्याच्या विकासासाठी मोठी मदत केली आहे. भविष्यातही महाराष्ट्र चेंबरचे सहकार्य राहणारच आहे. त्यामुळे काळजी करु नका, उद्योग, व्यापाराला लागणाया सर्व सुविधा देऊन येत्या काही दिवसांत महाराष्ट्र एक क्रमांकांचे राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या विकासातील पूर्वीचे सर्व अडथळे दूर केले जात आहेत. यापुढे `बुलेट ट्रेन` सारखा गतीने राज्याच्या विकासाची घौडदौड सुरु राहील, असा विश्वासही त्यांनी दिला.

राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रीकल्चर, महाराष्ट्र सरकारचा उद्योग विभाग आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने १७ फेब्रुवारीपासून ब्रांदा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मुंबई येथे महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो (मायटेक्स) चा भव्य शानदार शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी झाला. त्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. येत्या २६ फेब्रुवारी पर्यंत हा एक्स्पो सुरु राहणार असून त्याची सकाळी ११ ते रात्री ९ अशी वेळ राहणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबरचे चीफ पेट्रन कांतीलाल चोपडा यांचा सत्कार झाला. एसबीआयचे उपव्यवस्थाकीय संचालक प्रवीण राघवेंद्र, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, महाराष्ट्र चेंबरच्या विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, करुणाकर शेट्टी, शुभांगी तिरोडकर, सुधाकर देशमुख, रवींद्र माणगावे, चंद्रशेखर पुनाळेकर, तनसुख झांबड, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देशात महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. या राज्यात उद्योगस्नेही राज्य शासन कार्यरत आहे. उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, सवलती व कुशल मनुष्यबळ येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मैत्री अंतर्गत एक खिडकी योजनेतून उद्योगांना सर्व परवाने देण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांचे आवडते ठिकाण आहे. आमचे सरकार हे सामान्य नागरिकांचे उद्योगांचे, विकासाचे ध्येय ठेवणारे सरकार आहे. राज्यात उद्योग वाढीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी. राज्य शासनामार्फत त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे. त्यामुळे उद्योगांनी येथे यावे व गुंतवणूक करावी. दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने सुमारे १ लाख ३७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणली आहे. या गुंतवणूकीत उद्योजकांनी मोठा विश्वास दाखविला आहे. या परिषदेत झालेले सामंजस्य करार केवळ कागदावर राहणार नाहीत. उद्योग, गुंतवणुकदारांना राज्य सरकारतर्फे सर्व सहकार्य दिले जात आहे. राज्य सरकार नेहमीच औद्योगिक विकासासाठी सोबत आहे. पुढील काळातही उद्योगांना लागणारे सर्व सहकार्य राज्य शासन करेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पूर्वीच्या सरकारच्या काळात न झालेले प्रकल्पाची कामे आमच्या सरकारने केले. मुंबई, पुणे, नाशिक पर्यंतच विकास मर्यादित राहणार नाही. मराठवाडा, विदर्भातही सामंजस्य करार केले आहे. संपूर्ण महाराष्ट्र विकासाचे ध्येय आहे. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कोणतेही काम केले जात नाही. राज्यात अजूनही विकासाचे खूप प्रकल्प हाती घेतले आहेत, ते लवकरच मार्गी लागतील.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅगीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, महाराष्ट्र चेंबरतर्फे राज्यातील व्यापार आणि उद्योगाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. मायटेक्स देशभरातील उद्योजक आणि व्यापार्यांना व्यापारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी मायटेक्स एक्स्पो भरविले आहे. गेल्या सात महिन्याच्या काळात सध्याच्या सरकारने उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्याचे काम केले आहे. नॉन वू्व्हनमधील काही वस्तूंना प्लॉस्टिक बंदी आदेशातून वगळल्याने सुमारे ८ लाख महिलांना राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा झाला आहे. हा निर्णय घेतल्याबद्ददल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत आहे. महाराष्ट्र चेंबरने सरकारकडे मांडलेले सर्व प्रश्न मार्गी लावले आहेत. भविष्यातही चेंबरचे सर्व प्रश्न मार्गी लागतील. दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत राज्य सरकारने १ लाख ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणली. दरम्यान चेंबरच्या शतकमहोत्सव वर्षानिमित्त देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना आमंत्रित करण्याची चेंबरची इच्छा चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली. या मायटेक्समुळे महाराष्ट्रातील व्यापार, उद्योगाचा प्रचार, प्रचार होऊन पोषण वातावरण निर्माण होऊन देशात एक नंबरचे राज्य बनविण्यात महत्वपूर्ण ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, गेल्या २५ वर्षात उद्योग, व्यापाराचा विकास झालेला नाही, तेवढा विकास आमचे सरकार आल्यानंतर झपाट्याने वाढला. येत्या ऑक्टोबर महिन्यात `मॅग्नेटिक महाराष्ट्र` घेण्याचे नियोजन सुरु आहे.

महाराष्ट्र चेंबरने सहकार्य केल्यास हा जगातील मेगा इव्हेंट ठरणार आहे. उद्योजकांना नवीन उद्योग सुरू करतांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी एक खिडकी योजना सुरु केली आहे. या माध्यमातून उद्योजकांना विविध परवानग्या एकाच ठिकाणी देण्यात येत आहे. उद्योगांना तीस दिवसांत सर्व प्रकारच्या परवानगी दिल्या जात आहेत. गेल्या अडीच वर्षाच्या काळात उद्योगांना भत्ता, सबसिडी वेळेवर मिळत नव्हत्या. आमच्या सरकारने २३०० कोटी रुपयांचा भत्ता थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला. सुमारे २ हजार कोटी रुपये उद्योजकांच्या खात्यावर जमा केले. सूक्ष्म, लक्ष्म, मध्यम प्रकल्पांसह मेगा प्रोजेक्टला सर्वच खात्याच्या परवानगी दिली आहे. वेळेत परवानगी दिली नसल्यास संबधित अधिकारी जबाबदार राहणार आहेत. त्यासह उद्योग आयुक्तांना अधिकार दिले आहेत. उद्योगासाठी सरकारकडून रेड कार्पेट दिले जाणार आहे. राज्यात रोजगार वाढीसाठी शासन प्रयत्नशील आहे. राज्यात उद्योग वाढीसाठी व नवीन उद्योग येण्यासाठी मोठ्या उद्योगांसोबतच लहान उद्योगांनाही प्रोत्साहन देण्यात येत आहे. उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी यांनी आभार मानले. महाराष्ट्र चेंबरचे कार्यकारिणी सदस्य, व्यापारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काय आहे एक्स्पोत :

भव्य असलेल्या या एक्स्पोमध्ये आर्टस्, क्राफ्टस्, शॉप, कल्चरची पर्वणी आहे. एक्स्पोची वेळ सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत आहे. यामध्ये इंटरनॅशनल, स्टेटस् पॅव्हेलियन, खादी, हॅण्डलूम, हॅण्डीक्राफ्ट, लाइफस्टाइल, फॅशन, इंटिरिअर, होम युटिलीटी, हाऊसवेअर, पॅकेजड् फुडस्, अँपलायसेन्स, हेल्थ आणि ब्युटी प्रॉडक्ट, गिफ्ट आर्टिकल, स्टेशनरीसह नानाविध प्रकारच्या नमुन्याच्या वस्तूचा खजिना खुला आहे. या एक्स्पोमध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा, जम्मू काश्मीर, राजस्थान आणि राज्य, देश आणि परदेशातील व्यापारी उद्योजकांचा सहभाग आहे.

केमिकल विरहित भाजीपाला :

महाराष्ट्र चेंबरच्या मुंबईच्या उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर यांचे `हर घर केमिकल विरहित भाजीपाला` हे ध्येय घेऊन कार्यरत आहेत. या ध्येयानुसार त्यांनी केमिकल विरहित भाजीपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.