मुंबई : अकोला जिल्हा रुग्णालयातील गट ‘अ’ व ‘ब’ संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत, तर ‘क’ व ‘ड’ संवर्गातील पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात भविष्यात मनुष्यबळ कमी पडणार नाही, अशी दक्षता शासन घेणार असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत सदस्य अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.महाजन बोलत होते. यावेळी सदस्य प्रसाद लाड यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
अकोला शासकीय रुग्णालयात मंजूर ४७६ खाटा आहेत. प्रत्यक्षात सद्यस्थितीत दुप्पट क्षमतेने हे रुग्णालय कार्यरत असून, येथील रुग्णांना याची मदत होत आहे. या रूग्णालयात गट ‘अ’ व ‘ब’ वर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत, तर गट ‘क’ वर्गातील ९० पदे टीसीएसमार्फत आणि बाह्यस्त्रोताद्वारे ५ हजार ५६ पदांची भरती लवकरच करण्यात येणार आहे. याचबरोबर राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात मनुष्यबळ कमी पडणार नाही यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु असल्याची माहिती, मंत्री श्री.महाजन यांनी यावेळी दिली.