अकोला : अविकसित एमआयडीसी, प्रदूषित करणारे कोणतेही मोठे कारखाने नाहीत. त्यानंतरही वर्हाडातील महानगरपालिका असलेले अकोला, अमरावती ही दोन्ही शहरं राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये आहेत.
गेली सहा वर्षांपासून सातत्याने प्रदूषित शहरांमध्ये या दोन्ही शहरांचा क्रम लागत असतानाही हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी गांभिर्याने उपाययोजना होत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.देशातील १३१ शहर आणि परिसर अतिशय प्रदूषित असल्याचे केंद्र शासनातर्फे जाहिर करण्यात आले आहे. या १३१ शहरात हवेची गुणवत्ता ही राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक खराब आहे.केंद्र सरकारकडून या शहरातील हवेच्या गुणवत्तेवर वारंवार नजर ठेवली जात आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार या शहरांना ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम’ अंतर्गत ठेवण्यात आले आहे.
जेणेकरुन या शहरातील हवेची गुणवत्ता सुधारता येईल. वर्हाडातील अकोला, अमरावतीसह राज्यातील १९ शहरातील ‘पार्टिक्यूलेट मॅटर’ (कण द्रव्य) मध्ये २० ते ३० टक्के घट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे लक्ष्य २०२४ ते २०२८ या काळासाठी ठेवण्यात आले आहे.गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रदूषित शहरांची यादी सादर करुनही त्याची गांभीर्याने दखल न घेतली गेल्याबद्दल सरकारने नाराजी व्यक्त केली आहे.
केंद्राने निश्चित केलेल्या मानकानुसार, ‘पार्टिक्युलेट मॅटर १०’ चं वार्षिक सरासरी प्रमाण ६० आणि नायट्रोजन डॉयऑक्साइडचं वार्षिक सरासरी प्रमाण ४० पेक्षा अधिक असल्यास त्या शहरांना प्रदूषित शहर म्हटलं जातं. त्यात अकोला, अमरावती शहरांचा समावेश आहे.
हवेतील गुणवत्ता खराब असल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वी अकोला महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे. दरवर्षी नोटीस बजावूनही प्रदूषण नियंत्रणासाठी कोणत्याही उपाययोजना महानगरपालिका प्रशासनाकडून होताना दिसत नाही.