mumbai-sunday-mega-block
ताज्या बातम्या मुंबई

आज रेल्वेचा मेगाब्लॉक : घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या !

मुंबई : रेल्वेच्या देखभाल दुरूस्तीच्या कामांसाठी आज मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दिलासा म्हणजे पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नाही. त्यामुळे प्रवाशांनो, आज रविवारच्या सुट्टीच्या दिवशी कुठे फिरण्यासाठी बाहेर जाण्याचा प्लान करत असाल, तर सर्वात आधी मुंबई लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या…

मध्य रेल्वे (central railway)

मध्य रेल्वेवर विद्याविहार ते ठाणे दरम्यान, पाचवी आणि सहावी लाईनच्या कामासाठी सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या डाऊन आणि अप मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि विद्याविहार दरम्यान, डाऊन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर लाईन सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत ब्लॉक असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड इथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे इथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. दरम्यान, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

हार्बरवरील प्रवाशांना मेगाब्लॉकमुळे खास सूट

हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरुन प्रवास करण्याची परवानगी असेल. या पायाभूत सुविधा अपग्रेड ब्लॉकमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.