ban-pradeep-mishra
अकोला

कथाकार प्रदीप मिश्रा यांच्या प्रवचनांना राज्यात बंदी घाला

अकोला – सिहोर येथे नुकत्याच झालेल्या रुद्राक्ष वितरण प्रकरणात चेंगराचेंगरी होऊन अनेक भाविकांचा मृत्यू झाला आहे.सिहोर येथील कथाकार प्रदीप मिश्रा हे या माध्यमातून समाजात अंधश्रद्धा फैलवून भाविकांच्या भावनेशी खेळत आहेत.

सबब त्यांच्या कथा प्रवचनांना राज्यात बंदी घालण्याची मागणी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे समवेत अनेक संघटनांनी केली. स्थानीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत गावंडे यांनी आपल्या आंदोलनाची माहिती दिली.

राज्यात कथा प्रवचनांना पेव फुटले असून सिहोर येथील प्रदीप मिश्रा असो अथवा बागेश्वर सरकार असो हे कथा प्रवचनांच्या माध्यमातून आपली तिजोरी भरीत असून भाविकांच्या डोळ्यात अंधश्रद्धेच्या माध्यमातून धूळ फेकीत असल्याचा आरोप गावंडे यांनी यावेळी केला.सिहोर येथे वितरित केलेल्या दहा लाख रुद्राक्षापैकी नऊ लाख रुद्राक्ष हे लाकडाचे व खोटी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

पुरोगामी राज्यात अशा कथा प्रवचनांना आता नव्या जोमाने आळा घालण्यात येणार असून प्रदीप मिश्रा यांच्या अकोल्यात होऊ घातलेल्या प्रवचनाच्या संदर्भात विश्व वारकरी संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती समवेत अनेक पुरोगामी संघटनांच्या माध्यमातून व्यापक धरणे आंदोलन राबविण्यात येणार असल्याची माहिती गावंडे यांनी यावेळी दिली.

सिहोर येथे झालेल्या रुद्राक्ष वितरणात मृत्यू पावलेल्या भाविकांच्या संदर्भात मिश्रा यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी ही गावंडे यांनी यावेळी केली.या संदर्भात सामूहिक पुढाकाराने प्रथम एक दिवसीय धरणे, त्यानंतर आंदोलन व त्यानंतर आमरण उपोषण करून जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.प्रवचनासाठी मिश्रा व बागेश्वर सरकार यांना अकोल्यात पाय ठेवू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

प्रशासनाने जर मिश्रा यांना परवानगी दिली तर व्यापक आंदोलन राबविण्यात येणार असून प्रसंगी साम-दाम-दंड-भेद च्या माध्यमातून उठाव केल्या जाणार आहे. जर यात काही झाले तर याला शासन प्रशासन जबाबदार असल्याचे गावंडे यांनी यावेळी सांगितले.

भाविकांच्या आस्था व भावनेशी खेळणाऱ्या अश्या प्रकारणांच्या संदर्भात जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेत यावेळी विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष हभप अरुण महाराज बुरघाटे, हभप सोपान महाराज, गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा प्रमुख एड वंदन कोहाडे, गुरुदेव सेवा मंडळाचे रामराव पाटीलखेडे,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शरद वानखडे, गजानन हरणे समवेत विविध संघटनांचे अनेक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.