अकोला

गीता परिवार हे सुयोग्य संस्काराचे व्यासपीठ-डॉ.आशुजी गोयल

अकोला: भगवद्गीता ही सकल ज्ञानाची जननी असून या ज्ञानाने कायिक, वाचिक व आत्मिक शांती व सद्गतीची निर्मिती होऊन निकोप समाज व्यवस्था निर्माण होते.सकल कल्याणाचे ब्रीद घेऊन गीता परिवार साधकांना एकत्रित करून सामूहिक उर्जेची निर्मिती या माध्यमातून सामाजिक सुदृढतेसाठी करीत असल्याची माहिती लखनऊ येथील लर्न गीताचे प्रचारक व गीता परिवारचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.आशूजी गोयल यांनी दिली.

राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक उपक्रमांच्या माध्यमातून भगवद्गीतेचा व्यापक प्रचार व प्रसार करून लोकजागृती करणार्‍या गीता परिवार अकोलाच्या वतीने रविवारी स्थानीय गौरक्षण रोड येथील शुभमंगल सभागृहात मैत्री मिलन सोहळा संपन्न झाला.यात मार्गदर्शक डॉ.आशू गोयल मार्गदर्शन करीत होते. यावेळी मंचावर सोहळ्याचे स्वागताध्यक्ष विमल गोयनका,गीता परिवारच्या विदर्भ अध्यक्ष सौ शोभा हरकुट,गीता परिवारच्या अकोला अध्यक्ष सौ कल्पना भुतडा आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ गोयल पुढे म्हणाले, अगदी कोरोना संकटातही लाखो साधकांच्या समवेत गीतेचा व्यापक प्रचार व प्रसार ऑनलाइनच्या माध्यमातून सुरू होता.

आज देश विदेशात साडेपाच लाख साधक गीता परिवाराचे असून १०० देशात ५ हजार सूत्रबद्ध कार्यकर्त्यांच्या सहकार्याने लर्न गीता हा समाजोपयोगी व ज्ञानोपयोगी उपक्रम सुरू असून जागतिक स्तरावर १३ भाषेत हा उपक्रम सुरू आहे .आगामी सन २०५० पर्यंत गीता परिवार हा जगातील सर्वात मोठा परिवार म्हणून मान्यता पावेल.यासाठी हर घर गीता हा संकल्प गीता परिवाराने केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संस्कृतच्या व्यापक प्रचार, प्रसार व संस्कृतचे उच्चारण शुद्ध झाले पाहिजे यासाठी गीता परिवाराने नवी समिती गठित केली असून यात संशोधन होऊन भाषा विकसित होत असल्याचे सांगितले.आपल्या पॉवर पॉइंट द्वारे केलेल्या मार्गदर्शनात गोयल यांनी सुखी जीवनाचे सहा सूत्रात विवेचन केले.

जीवनाच्या क्षेत्रात सहा विषय अंगीकृत असून यामध्ये ज्ञान, वित्त, आरोग्य, कुटुंब ,अध्यात्म व आपणाला आवडणारा एक विषय असे हे सहा विषय समाविष्ट आहेत. ज्ञानामध्ये कला,शिक्षण, संस्कार, व्यवहाराचे ज्ञान, आकलन शक्ती आदींचा समावेश होत असून ज्ञानामुळे सत्याचे आकलन होऊन आपण सुश्रुत होतो. म्हणून जीवनात ज्ञानही आवश्यक असल्याचे सांगितले. ज्ञानाबरोबर वित्ताचा विषयी ही महत्वपूर्ण असून वित्त हे जीवनयापन करण्यासाठी पाहिजे. मात्र त्याचा दुरुपयोग होता कामा नये. अतिरिक्त धनसंचय हा नाशास कारणीभूत होऊ शकतो. आवश्यकता पेक्षा जास्त धन संग्रह करू नका. धनाची गती ही भोग, दान, व नाश या तीन सूत्रात असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्याचे सूत्रही त्यांनी यावेळी सांगून हितभूक, मित भूक व श्रुतभूक हे भोजनाचे तीन नियम असून प्रत्येक अंगाकडून कोणत्या काम करून घ्यावे याचे विवेचन झाले तरच आरोग्य हे शाबूत राहते.

कुटुंब या उक्तीची उकल करताना त्यांनी समाज, मित्र, मोठ्यांचा आशीर्वाद, प्रथम नाते मगच रिश्ता, पत्नी सोबतचे सलोख्याचे संबंध,बाल संरक्षण आदी विषयांचे विवेचन केले.अध्यात्म या सूत्रावर बोलताना त्यांनी आराधना, धर्मप्रचार,समाजसेवा, देशसेवा,साधी राहणी व उच्च विचारसरणी याची सुंदर भूमिका मांडली. अध्यात्म हे अति प्राचीन असून हजार वर्षाची सांस्कृतिक परंपरा युवा पिढीने जतन करून ती पुढच्या पिढीपर्यंत पोहाचवली पाहिजे. हे समाजाचे कर्तव्य असून दायित्व समजले गेले पाहिजे.अंतिम सहाव्या सूत्रावर बोलताना ते म्हणाले, जो आपणाला आवडेल असा विषय जीवन व्यवहारात निवडून त्या विषयाची आराधना करून त्या विषयात पारंगत होण्याचे लक्ष निर्धारित केले तर जीवन सुखमय व सुखकर होते.

म्हणूनच गीता परिवार अशा सर्व बाबींचा उहापोह करीत असून अगदी बालसंस्कार शिबिरापासून तर सर्व संस्कार गीता परिवाराच्या माध्यमातून जगात होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या सोहळ्याचा प्रारंभ दीप प्रज्वलन व स्वागताने करण्यात आला. यावेळी भगवद्गीताचे अठरा अध्याय मुखोदगत असणार्‍या पंधरा गीताव्रती साधकांचा डॉ गोयल यांनी स्मृतिचिन्ह व मेडल देऊन सन्मान केला. सोहळ्यात यावेळी श्याम मणियार, प्रदीप राठी, प्रणय बुब आदींच्या उपस्थितीत संगमनेर येथील गीता परिवाराच्या तेजोवलय पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.

कार्यक्रमात शोभा हरकुट यांनी गीता परिवाराच्या उपक्रमांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, गीता परिवार हा भागवत भक्ती, भगवद्गीता, भारत माता,विज्ञान दृष्टी तथा विवेकानंद या पाच सूत्रांनी अंगीकृत असून हे पाच सूत्र घेऊन वाटचाल करीत असल्याचे सांगितले.प्रास्ताविक गीता परिवार अकोला च्या अध्यक्षा सौ कल्पना भुतडा यांनी करून उपक्रमा ची माहिती दिली. तर स्वागताध्यक्ष विमल गोयनका यांनी आपले स्वागतपर मनोगत व्यक्त करीत या उपक्रमास आपल्या शुभेच्छा बहाल केल्यात. मान्यवरांचे स्वागत दिलीप गोयनका, नारायण भाला, नवल भरतीया यांनी केले.पाहुणे परिचय सौ सोनल गोयनका यांनी केला.संचालन गीता परिवार अकोला च्या सचिव जया जाजू व कीर्ती टावरी यांनी तर आभार सौ विना राठी यांनी मानलेत.