arrest_1_910
क्राईम

अकोला: दोन बांगलादेशींसह चौघांना अटक

अकोला: खोटे कागदपत्र बनवून पासपोर्ट बनवण्याच्या इराद्यात असलेले दोन बांगलादेशी, दमानिया हॉस्पिटलमधील एक जण व आणखी एकाला अशा चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

२०१६ मध्ये किडनी तस्करीमध्ये आरोपी असलेल्या देवेंद्र शिरसाट याला फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये जुने शहर पोलिसांनी अटक केला होती. त्याची कसून चौकशी केल्यानंतर दमानी हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या वाकपंजर या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली.या दोघांच्यापोलिस कोठडी दरम्यान आणखी दोन युवकांची नावे समोर आली.

ठाकूर यांच्या वाड्यात राहणार्‍या त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ते दोघे बांगलादेशचे नागरिक असल्याचे चौकशीत समोर आले.या दोघांनीही सिलिगुडीचे एजंटच्या माध्यमातून आधार कार्ड बनवल्याचे समोर आले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत ते चहापत्तीचा व्यवसाय करत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तो त्यांचा बनाव होता. या दोघांनी येथून बँकेचे पासबुक सुद्धा काढले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे निवासी पुराव्याचे कागदपत्र बनवणे व त्यानंतर पासपोर्ट काढण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांच्या चौकशी समोर आले आहे.

जुने शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी याप्रकरणी सखोल चौकशी केली असता आरोपींना अटक केली. त्यांच्यावर फॉरेन अ‍ॅक्टनुसार कारवाई करून रविवारी यातील बांगलादेशी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. या बांगलादेशींचा नेमका इरादा काय होता याची चौकशी पोलिस करत असून, चौकशीअंती खरे काय ते समोर येणार आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनात जुने शहर पोलिस कारवाई करत आहेत.